प्रविण दरेकर यांना मोठा धक्का

0
223

मुंबई, दि. १३ (पीसीबी) : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यासाठी महत्वाची असलेल्या मुंबई बँकेत शिवेसना आणि राष्ट्रवादी नवी खेळी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय. मुंबई बँक अध्यक्ष निवडणुकीत दरेकर यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मुंबई बँकेतील प्रतिनिधींची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते.

या बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यानंतर दोन्ही पक्षातील नेत्यांनी मिळून मुंबई बँकेवरील भाजपच्या वर्चस्वाला धक्का देत सत्ता परिवर्तन करण्याची रणनिती आखल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर यांची उमेदवार जाहीर करण्यात आलीय. तसंच शिवसेना आमदार सुनिल राऊत आणि शिल्पा सरपोतदार यांच्यावर महत्वाची जबाबदारी दिली जाणार असल्याचंही समजतं. मुंबईत बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी गुप्त मतदान होणार आहे. त्यावेळी कोण कुणाच्या पारड्यात मत टाकतं आणि कोण निवडून येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मुंबई बँकेवर कोणत्या पक्षाचे किती संचालक?

भाजप संचालकांमध्ये प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, विठ्ठल भोसले, आनंद गाड, कविता देशमुख, विनोद बोरसे, सरोद पटेल, नितीन बनकर, अनिल गजरे यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस संचालकांमध्ये संदीप घनदाट, शिवाजीराव नलावडे, पुरुषोत्तम दळवी, विष्णू गंमरे, सिद्धार्थ कांबळे, जयश्री पांचाळ, नंदू काटकर, जिजाबा पखर आणि शिवसेना संचालकामध्ये सुनील राऊत, अभिषेक घोसाळकर, शिल्पा सरपोतदार यांचा समावेश आहे. त्यामुळे मुंबई बँकेत शिवसेना राष्ट्रवादीचं गणित जुळले. शिवसेना + राष्ट्रवादी काँग्रेस मिळून 11 संचालक झाले आणि दरेकर यांचा पाडाव झाला.