प्रवासी बसवण्याच्या वादातून हिंजवडीतील रिक्षाचालकाला लोखंडी रॉडने जबर मारहाण

0
556

हिंजवडी, दि. १३ (पीसीबी) – प्रवासी बसवण्याच्या वादातून हिंजवडीतील एका रिक्षाचालकाला दुसऱ्या रिक्षा चालकाने लोखंडी रॉडने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि. १२) दुपारी साडेचारच्या सुमारास हिंजवडीतील कोयते वस्ती चौकात घडली.

गोपीनाथ धोंडिबा आढाव (वय ४५, रा. पुनावळे) असे जखमी रिक्षा चालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रोहिदास गोपीनाथ पारखी (रा. पुनावळे) या दुसऱ्या रिक्षाचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपीनाथ रिक्षा चालविण्याचे काम करतात. रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ते हिंजवडीतील कोयते वस्ती चौकातून प्रवाशांना घेऊन जात होते. त्यावेळी रोहिदास या रिक्षा चालकाने गोपीनाथ यांची रिक्षा अडवली. रिक्षामध्ये बसलेल्या प्रवाशांना त्याने खाली उतरवले. तसेच, “इथे धंदा करायचा नाही”, असे म्हणत गोपीनाथ यांना लोखंडी पाईपने मारहाण केली. यामध्ये गोपीनाथ गंभीर जखमी झाले आहेत. आरोपी रोहिदास याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.