प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री?

0
478

पणजी, दि. १८ (पीसीबी) –  मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी भाजपचे प्रमोद सावंत विराजमान होण्याची शक्यता आहे. प्रमोद सावंत हे सध्या गोवा विधानसभेचे अध्यक्ष आहेत. प्रमोद सावंत साखळी मतदारसंघाचे आमदार असून ते व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्याच्या घोषणेसाठी सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्षातील आमदारांच्या बैठकांचे सत्र सुरु आहे. या बैठकीत प्रमोद सावंत यांच्या नावावर चर्चा झाल्याचे समजते. भाजप, गोवा फॉरवर्ड पार्टी यांनी प्रमोद सावंत यांच्या नावाला सहमती दर्शवली आहे. पण महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीने नेत्यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. मात्र आज दुपारी सत्ताधारी भाजप आपल्या विधीमंडळ गटनेत्याची निवड करु शकते.

मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यात सत्तेसाठी संघर्ष सुरु झाला आहे. एकीकडे मोठा पक्ष म्हणून काँग्रेसने राज्यपालांना पत्र लिहून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. तर नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रविवारीच गोव्यात दाखल झाले असून त्यांनी युती सरकारच्या आमदारांसोबत बैठक घेतली. सुमारे सहा तास चाललेल्या या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. मात्र आता गोवा विधानसभेचे अध्यक्ष प्रमोद सावंत यांची नवे मुख्यमंत्री म्हणून निवड होण्याची शक्यता आहे.