Maharashtra

प्रबोधनकार ठाकरेंनी वास्तव्य केलेल्या वाड्याला राज ठाकरेंनी दिली भेट

By PCB Author

October 21, 2018

अमरावती, दि. २१ (पीसीबी) – परतवाड्यातील किराड वाड्यात १९२६ ते ३२  या कालावधीत  प्रबोधनकार ठाकरे यांनी वास्तव्य केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे पाचवीपर्यंतचे शिक्षणही येथेच झाले. बाळासाहेब, मीनाताई यांच्या अस्थीही या वाड्यात आहेत. दरम्यान, अमरावती दौऱ्यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  या वाड्याला भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी तीन वेळा वाड्याला भेट दिली आहे.

प्रबोधनकार ठाकरे परतवाडा येथे न्यायालयात अधिकारी होते. त्यावेळी  किराड वाड्यात वास्तव्यास होते.राज यांनी  या वाड्याला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. मेळघाटवरून अमरावतीकडे परत येत असताना परतवाड्याला थांबले. आमदार बाळा नांदगावकर आणि अमरावतीचे स्थानिक पदाधिकारी त्यांच्यासोबत होते.

यावेळी वाड्याच्या मालकाचे नातू मनीष उघडे यांची त्यांनी भेट घेतली. परतवाड्याचे ज्येष्ठ नागरिक अनंत पिंपरकर यांनी प्रबोधनकार यांना जवळून पाहिले होते. त्यांनी राज यांनी जुन्या आठवणी सांगितल्या. सोबतच अल्बममधील काही छायाचित्रे आणि वर्तमानपत्रातील कात्रणेही दाखिवली. कौलारू घर अजूनही सुस्थित उभे आहे. याप्रसंगी विनय, मनीष, रती आणि रुपाली उघडे उपस्थित होते.