Maharashtra

प्रदेश काँग्रेस, मुंबई काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत

By PCB Author

July 25, 2018

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत काँग्रेस नेतृत्वाने दिले आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीसाठी सरकारविरोधात वातावरण तयार कऱण्यास प्रदेश काँग्रेसला यश आलेले नाही. त्यामुळे लवकरच पक्षात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.   

महाराष्ट्रात भाजप व शिवसेना सरकारविरोधात आक्रमकपणे रस्त्यावर उतरण्यास प्रदेश काँग्रेसचे नेते तयार नाहीत, अशा बातम्या काँग्रेस हायकमांडकडे गेल्या आहेत. देशातील प्रत्येक राज्यांमधील काँग्रेसच्या कामगिरीची माहिती काँग्रेस नेतृत्वाने घेतली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात काँग्रेसची कामगिरी तितकी चांगली नसल्याचे समोर आले आहे. लोकसभेच्या निवडणुका जवळ  आल्या  तरी प्रदेश काँग्रेसमधील गटबाजी सुरूच  आहे. काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी सरस  असल्याने त्याचा काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना सक्रीय करण्यासाठी राज्यात विभागनिहाय जबाबदाऱ्या पक्षाच्या नेत्यांकडे देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

विदर्भ हा काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला होता. मात्र, तेथे सध्या काँग्रेसकडे सक्षम नेतृत्व नाही. नागपूर विभाग व विदर्भातील अन्य जिल्हयांवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पक्ष नेतृत्वाने पाऊले उचलली आहेत. याची  जबाबदारी पक्षाच्या तरूण नेत्यांवर दिली जाणार आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण या विभागांची जबाबदारी तेथील नेत्यांकडे सोपविली जाणार आहे. विभागनिहाय नेतृत्वाला महत्त्वाचे अधिकारही दिले जाणार आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाच्या अधिकाराचे विकेंद्रीकरण होणार आहे.