प्रत्येक भाषणात PMC घोटाळ्यावर बोलणार ; राज

Maharashtra

प्रत्येक भाषणात PMC घोटाळ्यावर बोलणार ; राज ठाकरे

By PCB Author

October 12, 2019

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – आर्थिक गैरव्यवहारामुळं निर्बंध लादण्यात आलेली पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) खातेदारांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. खातेदारांनी आपापल्या अडचणींचा पाढा राज यांच्यापुढे वाचला आणि मदतीची विनंती केली. खातेदारांच्या समस्यांबाबत आवाज उठविण्याचे व निवडणूक प्रचारातील प्रत्येक भाषणात या घोटाळ्यावर बोलण्याचे आश्वासन राज यांनी यावेळी दिले.

पीएमसी बँकेतून पैसे काढण्यावर सध्या निर्बंध आहेत. त्यामुळं खातेदार हवालदील झाले आहेत. कुणाला आपल्या मुलाबाळांची लग्नकार्यं पुढे ढकलावी लागली आहेत. तर, कुणाला दागिने गहाण ठेवून जगण्याची वेळ आली आहे. राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत हा मुद्दा लावून धरला आहे. प्रत्येक सभेत पीएमसी बँकेच्या घोटाळ्यावरून राज ठाकरे सत्ताधारी नेत्यांना धारेवर धरत आहेत. पीएमसी बँकेच्या संचालक मंडळावर भाजपचेच नेते आहेत हे राज जाहीरपणे सांगत आहेत. मनसेच्या या भूमिकेमुळं अपेक्षा उंचावलेल्या खातेदारांनी आज त्यांची भेट घेतली.