‘प्रत्येक परिचारिका फ्लोरेन्स नाईटिंगेल प्रमाणेच वंदनीय’ : आमदार महेश लांडगे

0
185

जागतिक परिचारिका दिन भोसरी रुग्णालयात साजरा

पिंपरी,दि. 12 (पीसीबी) – फ्लोरेन्स नाईटिंगेल यांनी ज्याप्रमाणे दुस-या महायुध्दात सैनिकांची सेवा सुश्रूषा केली. त्याचप्रमाणे कोविडच्या या महामारीत शहरातील रुग्णालयांच्या परिचारिका मनोभावे रुग्णांची सेवा करीत आहेत. त्यांचे हे कार्य शब्दात व्यक्त करता येणार नाही. फ्लोरेन्स नाईटिंगेल प्रमाणेच सर्व परिचारिका वंदनीय आहेत, असे प्रतिपादन आमदार महेश लांडगे यांनी केले.

12 मे फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. त्यानिमित्त भोसरी रुग्णालय आणि नविन भोसरी रुग्णालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात आ. लांडगे बोलत होते. यावेळी भोसरी रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, डॉ. अर्चना गांधी, डॉ. सुजाता नांगरे, डॉ. अनिकेत माथेसूळ, डॉ. लक्ष्मीकांत अत्रे, मेट्रन वत्सला वाझे, सिस्टर इनचार्ज श्वेता बनकर, सुजाता गोरे, रंजना कोठावळे तसेच सिस्टर संगिता घुगे, सिंधू नाईकरे, कल्याणी जगदाळे, मिरा शिंदे, उज्वला कोद्रे, अनुपम वेळे, बोदूल सिस्टर आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आ. महेश लांडगे म्हणाले की, परिचारिकांची सेवा हा वैद्यकीय क्षेत्राचा मुख्य कणा आहे. दुर्धर आजाराने किंवा कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराने बाधित झालेल्या रुग्णांची सेवा करण्यास वेळप्रसंगी कुटूंबातील सदस्य देखिल हतबल होतात. अशावेळी त्यांचा पुर्ण विश्वास परिचारिकांच्या सेवेवर असतो. परिचारिका या वेळप्रसंगी आपल्या स्वता:च्या व कुटूंबाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करुन जीवावर उदार होऊन रुग्णाची सेवा सुश्रूषा करतात. परिचारिकांच्या या सेवाभावी वृत्तीला मी मनापासून सलाम करतो. मनपाच्या बहुतांशी रुग्णालयात कर्मचा-यांची संख्या कमी आहे. त्यामुळे आरोग्य व वैद्यकीय यंत्रणेवर ताण येत आहे, यावर आपण लवकरच मार्ग काढू असेही आ. महेश लांडगे म्हणाले.

स्वागत प्रास्ताविक करताना भोसरी रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार म्हणाल्या की, जागतिक पातळीवर आरोग्याच्या गरजा, वाढलेली लोकसंख्या, वाढलेले आर्युमान त्यामुळे जुनाट दुर्धर रोगांमध्ये वाढ होते. अशा रुग्णांची सेवा करण्यासाठी उच्चप्रतिच्या परिचर्या सेवेची मागणी वाढत आहे. अशा आजारांच्या नियंत्रणासाठी, उच्चप्रतिच्या आरोग्य सेवा देण्यासाठी परिचारीकांची भूमिका महत्वाची असते. कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये आरोग्य सेवा देण्यासाठी, मदतकार्यासाठी परिचारिका नेहमीच तत्पर असतात. त्यांच्या सेवेचा सन्मान करण्याचा आजचा दिवस आहे. समाजसेवेचा घेतलेला हा वसा त्या पुढेही चालू ठेवतील, असा आशावाद डॉ. शैलजा भावसार यांनी व्यक्त केला.
यावेळी आ. लांडगे यांच्या उपस्थितीत केक कापून परिचारिका दिन साजरा करण्यात आला.
सुत्रसंचालन मेट्रन वत्सला वाझे तर आभार श्वेता बनकर यांनी मानले.