Maharashtra

प्रताप सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्राची लिंक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीत

By PCB Author

June 21, 2021

मुंबई, दि. २१ (पीसीबी) : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केलेल्या लेटरबॉम्बवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. प्रताप सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्राची लिंक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीत आहे, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. अंजली दमानिया यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना हा दावा केला आहे. डिजिटल विश्वात कोणी पत्रं लिहितं का? आपण व्हॉट्सअॅप वापरतो, फोन करतो, मेसेज करतो. मात्र, पत्रं लिहिलं जातयं आणि ते मीडियात येतंय हे हस्यास्पद आहे. या पत्रात दोन मुद्दे आहेत. एक म्हणजे शिवसेनेचा छळ केला जातोय आणि दुसरा मुद्दा म्हणजे शिवसेना-भाजपची विचारांची जवळीक होती हा आहे. या पत्राचे तार थेट मोदी-ठाकरे भेटीशी संबंधित आहेत, असा दावा करतानाच मोदींबरोबर भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंची देहबोली बदलली आहे. ते भाजपवर तीव्र शब्दात टीका करताना दिसत नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

शिवसेनेत दोन गट शिवसेनेत दोन गट असल्याचा दावाही दमानिया यांनी केला. शिवसेनेत दोन गट आहेत. एक मिलिंद नार्वेकरांचा आणि दुसरा संजय राऊतांचा. राऊतांना शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत राहावसं वाटतं. तर नार्वेकरांना शिवसेनेने भाजपसोबत राहावं असं वाटतं. यांच्याकडे तत्वही नाहीत आणि विचारधाराही नाही. केवळ पैसा यांच्यासाठी महत्त्वाचा आहे, अशी टीका त्यांनी केली.

सरनाईकांविरोधात सबळ पुरावे प्रताप सरनाईक यांनी पत्र लिहिलं असलं तरी त्यांच्या विरोधात सबळ पुरावे आहेत. त्यातून ते बाहेर पडू शकत नाहीत, असा दावाही त्यांनी केला. मात्र, आता या मुद्दयावरून भाजप राजकारण करण्याच्या तयारीत आहे. चुटकी सरशी सरकार बनवू असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत आहेत. त्यामुळे सेना-भाजप पुन्हा एकत्र होईल असं दिसत आहे, असंही त्या म्हणाल्या.

खडसेंवर हल्लाबोल यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावरही टीका केली. एकनाथ खडसे जे काही बोलले याची त्यांना खंत वाटायला हवी होती. पण त्यांना लाज शरम नाही. ते कधी माफी मागतील असं वाटत नाही, असंही त्या म्हणाल्या.