प्रचारादरम्यान भाषणाबाजी आणि मीडियापासून दूर रहा; पवार कुटुंबाचा पार्थ पवारला सल्ला

0
860

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि हेवीवेट नेते अजितदादांचे पुत्र पार्थ पवार पहिल्याच भाषणावेळी “क्लिन बोल्ड” झाले. परिणामी पार्थ पवार यांची सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. त्यामुळे पॉवरफुल पवार कुटुंबाने पार्थ पवार यांना प्रचारात भाषणाबाजी आणि मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पुणे आणि रायगड जिल्ह्यातील प्रत्येकी तीन यांप्रमाणे सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या मैदानात अजितदादांचे पुत्र पार्थ पवार उतरले आहेत. त्यामुळे या मतदारसंघांबाबत संपूर्ण राज्यात प्रचंड उत्सुकता आहे. पार्थ पवार यांच्या उमेदवारीला स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचंड विरोध असल्याची चर्चा होती. त्यामुळे शरद पवार यांनी पार्थ पवार हे लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. परंतु, त्यावरून कुटुंबात कलह निर्माण झाला आणि अखेर अजितदादांनी आपल्या मुलांसाठी मावळ मतदारसंघाची उमेदवारी खेचून आणल्याचे बोलले जाते.

पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाली आणि १७ मार्च रोजी वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डनमध्ये प्रचाराचा नारळही फुटला. यावेळी पार्थ पवार यांनी आपले केवळ अडीच-तीन मिनिटांचे भाषण चक्क वाचून दाखवले. ते सुद्धा अडखळत वाचले. लोकसभेचा उमेदवार आणि साधे भाषण सुद्धा नीट वाचता येत नाही, असा मेसेज मतदारांमध्ये गेल्याने राष्ट्रवादीवर नामुष्कीची वेळ आली. ही नामुष्की पुन्हा पुन्हा ओढवल्यास पार्थ पवार यांच्या प्रचारावर फार मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

हीच बाब ओळखून पवार कुटुंबियांनी पार्थ पवार यांना प्रचारादरम्यान भाषणाबाजी आणि मीडियापासून चार हात लांब राहण्याचे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पार्थ पवार यांनी १७ मार्चनंतर कोठेही भाषण केल्याचे दिसून येत नाही. केवळ हात जोडून गाठीभेटी घेण्यावर त्यांनी भर दिला आहे. दरम्यान, पार्थ पवार यांच्या विरोधात शिवसेनेचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. विरोधकांचा उमेदवार निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना भाषण करता येत नाही, हा प्रचाराचा मुद्दा ठरल्यास मतदारांनी नवल वाटून घेऊ नये.