प्रचाराच्या दगदगीमुळे काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख रूग्णालयात दाखल

0
457

लातूर, दि. १५ (पीसीबी) – प्रचाराच्या दगदगीमुळे लातूर ग्रामीण मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख यांची प्रकृती बिघडली असून  त्यांना लातूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  धीरज यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट शेअर करत  ही माहिती दिली आहे.

फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की,  कोणत्याही लहान मोठ्या आजाराकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नसते. मागील दोन-तीन दिवसांपासून अंगात थोडासा ताप होता. पण प्रचारसभांच्या व्यस्ततेमुळे तब्येतीकडे जरा दुर्लक्षच झाले. शेवटी नाईलाजाने काल लातूरमध्येच दवाखान्यात अॅडमिट व्हावे लागले आहे. हवामानातील सततच्या बदलामुळे सध्या तापीच्या आजाराचे प्रमाण सगळीकडे वाढले आहे.  सध्या आपण उपचार घेत असून आता प्रकृती सुधारते आहे. काळजी करावी, असे काहीं नाही, असेही त्यांनी  म्हटले आहे.

यावेळी धीरज देशमुख यांनी कार्यकर्त्यांनाही तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे.  माझे जिवाभावाचे कार्यकर्ते, हितचिंतक व आपण सर्वजण माझ्यासाठी प्रचार करत आहात. या दरम्यान आपण देखील तब्येतीची काळजी घ्या. तुमच्या शुभेच्छा आणि स्नेहाच्या बळावर मी लवकरच बरा होवून आपणासोबत प्रचारात सहभागी होईन हा विश्वास मला आहे,  असे धीरज देशमुख यांनी म्हटले आहे.