प्रचाराच्या तोफा थंडावल्या; छुप्या प्रचाराला वेग  

0
612

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा आज (शनिवारी) सायंकाळी ६ वाजता थंडावल्या. महायुती आणि महाआघाडीच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवून दिली होती. आज दिवसभर उमेदवारांनी रॅली, पदयात्रा, मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचार करण्यावर भर केला. पण आता छुप्या प्रचाराला वेग येणार आहे. विधानसभेसाठी सोमवारी (दि.२१) मतदान होत आहे. तर मतमोजणी गुरूवारी (दि.२४) होणार आहे.

भाजपचे राष्ट्रीय अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सभांनी जाहीर प्रचाराची सांगता झाली.  भर पावसात रोड शो, रॅली आणि सभांच्या माध्यमातून सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा डागल्या. आज प्रचार संपला असला, तरी आता उमेदवारांची छुपी मोर्चेबांधणी सुरू होणार आहे.

एकूण मतदार

  • महाराष्ट्रात पुरुष, महिला, तृतीयपंथी, दिव्यांग असे एकूण ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार
  • महाराष्ट्रात एकूण ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत.
  • यामध्ये पुरुष मतदार – ४ कोटी ६८ लाख ७५ हजार,७५०
  • महिला मतदार- ४ कोटी २८ लाख ४३ हजार ६३५,
  • तृतीयपंथी मतदार- २ हजार ६३४ आहेत.
  • दिव्यांग मतदार – ३ लाख ९६ हजार आहेत
  • सर्व्हिस मतदार- १ लाख १७ हजार ५८१ आहेत
  • मतदान केंद्रे
  • विधानसभा निवडणुकीसाठी ९६ हजार ६६१ मतदान केंद्रे आहेत.
  • मुख्य मतदान केंद्र – ९५  हजार ४७३ , सहायक मतदान केंद्र – १,१८८

खास महिलांसाठी, महिलांकडून संनियंत्रण करणारी आणि व्यवस्थापनावर भर देणारी  ३५२ ‘सखी मतदान केंद्रे’ स्थापन केली जातील.

विधानसभा निवडणुकीसाठी१ लाख ७९ हजार ८९५ मतदान यंत्र (बॅलेट युनिट) आणि १ लाख २६ हजार ५०५ नियंत्रण युनिट (कंट्रोल युनिट) तर सुमारे एक लाख ३५ हजार २१ व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे ६.५० लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.