प्रक्रियेवरील विश्वासच उडालाय, म्हणून मतदान केले नाही; अभिनेते नंदू माधव यांची उद्विग्न प्रतिक्रिया

0
1008

औरंगाबाद, दि. १० (पीसीबी) – ‘ईव्हीएमवरून होणाऱ्या मतदान प्रक्रियेवर माझा अजिबात विश्वास नाही. मी दिलेल्या मताचे काय होईल, हे सांगताच येत नाही. अशा स्थितीत मी मतदान तरी का करायचे, म्हणून यंदा मी मतदान केलेच नाही,’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया प्रसिद्ध अभिनेते नंदू माधव यांनी एका मराठी वृत्तपत्राशी बोलताना दिली आहे.

भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारे आणि आम आदमी पार्टीच्या सदस्यांनी २०१४ मध्ये उघडलेल्या मोहिमेत अभिनेते नंदू माधव सक्रिय कार्यकर्ते होते. आजही ते ‘आप’शी संबंधित आहेत. राजकीय प्रणालीत राहून देशाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड नष्ट करायची, या परिवर्तनवादी विचारांतून त्या काळी तत्कालीन सरकारविरोधात राळ उठवली होती. यातून त्यांनी बीडमधून भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात ‘आप’तर्फे निवडणूक लढवली. तेव्हा पराभव झाला असला तरी ‘निवडणूक लढवण्याचा अनुभव माझ्यासाठी खूप चांगला होता. त्यातून खूप शिकायला मिळाले,’ अशी प्रतिक्रिया नंदू माधव यांनी या वेळी दिली.

जनता उघड्या डोळ्यांनी बघतच नाही!

प्रत्येक ठिकाणी प्रस्थापित खासदाराला चांगला पर्यायच नाही, म्हणून त्याच त्या पक्षाचे उमेदवार निवडून येतात का, या प्रश्नाला उत्तर देताना नंदू माधव म्हणाले की, ‘प्रत्येक मतदारसंघातमध्ये किमान एक तरी चांगला, स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार असतो. पण ठरावीक पक्षांच्या प्रचाराच्या धुरळ्यात जनतेला चांगले पर्याय दिसतच नाही. निवडणुकीवेळी उमेदवारांकडे जनता उघड्या डोळ्यांनी बघतच नाही. त्यांच्या डोक्यात राजकारणी म्हणजे एक पक्ष आणि ठरावीक विचारधारा. पण ही घडी एकदा विस्कटली पाहिजे. वेगवेगळे अपक्ष उमेदवार निवडून आले पाहिजेत. तेव्हा कळेल नेतृत्व काय असते.’

आपण सेपियन्स आहोत, सोयीने सर्व विसरतो!

‘एक कलाकार, सामाजिक, राजकीय कार्यकर्ता या नात्याने मी समाज बदलू इच्छितो. काहीतरी धडपड करतो, पण माझी ही धडपड खोटी ठरणार, याची भीती आहे. कारण आपण सेपियन्स आहोत. कुणी केलेले चांगले काम, आपण सोयीनुसार विसरतो आणि पुन्हा प्रस्थापित पक्ष आणि नेत्यांच्याच मागे जातो. त्यामुळे माझ्यासारख्या अनेकांचे प्रयत्न अपयशी ठरतात,’ अशी भावना नंदू माधव यांनी व्यक्त केली.