Maharashtra

प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री करा, तर मला अर्थमंत्री; लक्ष्मण मानेंची इच्छा 

By PCB Author

September 29, 2018

सोलापूर, दि. २९ (पीसीबी) – भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना २०१९ मध्ये मुख्यमंत्री करायचे आहे. तर त्यांच्या मंत्रिमंडळात मला अर्थमंत्री व्हायचे आहे, अशी इच्छा माजी आमदार लक्ष्मण माने यांनी आज (शनिवार) येथे व्यक्त केली.  सोलापूरात आज वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी माजी आमदार विजयराव मोरे यांनी भाषण  करताना  वंचित आघाडीला मतदान करण्याची शपथ दिली. तसेच २०१९ मध्ये प्रकाश आंबेडकर हे मुख्यमंत्री होतील, आणि २०२४ मध्ये पंतप्रधान होतील, असा दावा केला. हाच धागा पकडत  लक्ष्मण माने  यांनी  वंचित आघाडीला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले.

आमची सत्ता आल्यास एकही शेतकरी आत्महत्त्या करणार नाही. मोफत शिक्षण दिले जाईल. सर्वांना रोजगार दिला जाईल, पण त्यासाठी मला अर्थमंत्री बनायचे आहे. मी सर्व देवस्थानची संपत्ती जप्त करुन सरकारजमा करून त्यामधून ही सर्व कामे करणार, असे सांगितले.