Maharashtra

प्रकल्प आणताना स्थानिकांना विश्वासात घ्यायला हवे- आदित्य ठाकरे

By PCB Author

September 18, 2019

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – आमचा कोणत्याही प्रकल्पाला विरोध नाही. पण, प्रकल्पांमुळे पर्यावरणाची हानी होऊ नये आणि असे प्रकल्प आणताना स्थानिकांना विश्वासात घ्यायला हवे, असे मत युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे यांनी मंगळवारी व्यक्त केले. तसेच युतीबाबतच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर देणे टाळले.

आदित्य ठाकरे यांची जनआशिर्वाद यात्रा मंगळवारी रात्री ठाण्यात आली. या निमित्ताने ठाण्यातील एनकेटी सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये बोलताना आदित्य यांनी राज्यात युती सरकारने केलेल्या कामाची माहिती दिली. तसेच नवमहाराष्ट्र घडवायचा असून त्यासाठी ठाण्याचा आशीर्वाद महत्वाचा आहे. संपूर्ण राज्यात ठाण्याच्या कामाचा पॅर्टन राबवायचा आहे, असेही त्यांनी सांगितले.  दरम्यान, नाणार प्रकल्पासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात पत्रकारांनी त्यांना कार्यक्रमानंतर प्रश्न विचारले. त्यावेळी आमचा कोणत्याही प्रकल्पाला विरोध नाही, पण प्रकल्पांमुळे पर्यावरणाची हानी होऊ नये आणि असे प्रकल्प राबविताना स्थानिकांना विश्वासात घ्यायला हवे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.