पोलीस माझी तक्रार घेत नाहीत, असे म्हणत महिलेचा पोलीस आयुक्तालयासमोर पेटवून घेण्याचा प्रयत्न

0
592

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – निगडी पोलिस माझी तक्रार घेत नाहीत, मी येथेच जीव देते, असे म्हणत रॉकेल अंगावर ओतून स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न  एका ५० वर्षीय महिलेने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासमोर केला. हा प्रकार शुक्रवारी (दि. १७) संध्याकाळी घडला. यामुळे पोलिस आयुक्तालयातील पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली.   

अनिता गायकवाड (वय ५०) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नांव आहे. या घटनेनंतर अनिता  यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिणीसोबतच्या संपत्तीच्या वादामधून अनिता गायकवाड  निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेल्या हो्त्या. मात्र,  पोलिसांनी गायकवाड यांची तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या अनिता यांनी  पोलिस आयुक्तालयाच्या मुख्य दरवाज्यापाशी येऊन रॉकेल अंगावर ओतून स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न केला.

या प्रकारानंतर पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली. यावेळी  पोलिस कर्मचारी हनुमंत बांगर यांनी तात्काळ प्रसंगावधान दाखवत अनिता गायकवाड यांना आत्महत्येचा प्रयत्न  करण्यापासून रोखले. यामुळे सुदैवाने अनिता यांनी कोणतीही दुखापत झाली नाही.  अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.