पोलीस नाईक आबासाहेब सावंत यांचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते सत्कार

0
231

पिंपरी, दि. 6 (पीसीबी) – विनामास्क वाहन चालकांवर कारवाई करत असताना एका वाहन चालकाने वाहतूक पोलीस कर्मचा-याला जखमी करून तब्बल 800 मीटर अंतर बोनेटवर बसवून नेले. यामध्ये प्रसंगावधान राखून कर्तव्यनिष्ठा दाखवणारे कर्तव्यदक्ष पोलीस नाईक आबासाहेब सावंत यांचा पोलीस आयुक्तांनी सत्कार केला. सावंत यांनी दाखवलेल्या या धाडसाबद्दल त्यांच्यावर शहर पोलीस दलातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी चिंचवडगाव परिसरातील अहिंसा चौक परिसरात चिंचवड वाहतूक शाखेतील पोलीस नाईक आबासाहेब सावंत हे मास्क न लावलेल्या वाहन चालकांवर कारवाई करीत होते. त्यावेळी आरोपी युवराज हनुवते हा त्याच्या कारमधून (एमएच 01 / वाय 8837) तिथे आला. त्याने तोंडाच्या खाली मास्क घेतल्याने पोलिसांनी त्यास कार बाजूला घेण्यास सांगितले.

कार बाजूला घेतो असे म्हणून तो पळून जाण्याचा प्रयत्न करून लागला. त्यावेळी कारच्या समोर पोलीस कर्मचारी सावंत हे होते. तो कार पुढे घेत असताना सावंत यांचा पाय कारच्या बोनेटमध्ये अडकला. त्यात त्यांच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. पोलीस नाईक सावंत यांनी आरोपी युवराज याला सांगूनही त्याने कार पुढे घेतली.

पोलीस नाईक सावंत यांनी जखमी अवस्थेत देखील कार चालकाला अडवण्याचा प्रयत्न करत कारच्या बोनेटवर बसले. कार चालकाने त्याही स्थितीत कार पुढे दामटली. सुमारे 800 मीटर अंतरापर्यंत हा थरार सुरू होता. रस्त्यावरील दुचाकी वाहन चालकांनी तसेच वाहतूक पोलिसांनी कारचा पाठलाग सुरू केला. तरीही कार चालकाने कार थांबविली नाही.

त्यानंतर एक दुचाकी चालकाने कारच्या पुढे जाऊन पुढच्या कार चालकाला गाडी थांबविण्याची विनंती केली. त्यानुसार पुढील वाहन चालकाने कार थांबविल्यानंतर माथेफिरू वाहन चालकाने कार थांबविली. पोलिसांनी कार चालकावर खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

पोलीस नाईक आबासाहेब सावंत यांनी दाखवलेल्या कर्तव्यनिष्ठेबद्दल पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सावंत यांचा सत्कार करून त्यांचे मनोधैर्य वाढवले. सावंत यांनी दाखवलेल्या या धाडसी निष्ठेबद्दल शहर पोलीस दलातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.