पोलीस ठाण्यात महिला पोलिसांना धक्‍काबुक्‍की करणा-या दोघांना अटक

0
455

चिंचवड, दि. २० (पीसीबी) – पोलीस ठाण्यात येऊन तक्रार देण्यासाठी आलेल्या नागरिकाला मारहाण केली. यावेळी पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनाही धक्‍काबुक्‍की करण्यात आली. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना चिंचवड पोलीस ठाणे येथे सोमवारी (दि. 19) दुपारी घडली.

सौम्या लालबिहारी यादव (वय 21) आणि सुशांत मेश्राम (दोघेही रा. नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. महिला पोलीस कर्मचारी शुभांगी राजेंद्र बाविस्कर यांनी सोमवारी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास चिंचवड पोलीस ठाण्यात एक तक्रारदार तक्रार देण्यासाठी आले होते. त्यावेळी आरोपी सौम्या आणि सुशांत पोलीस ठाण्यात आले. पोलिसांसमोरच त्यांनी तक्रारदार यांना मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केली असता आरोपींनी पोलिसांना अश्‍लील शब्दात शिवीगाळ केली. तसेच पोलिसांना धक्‍काबुक्‍कीही केली. यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करीत त्यांना अटक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.