पोलीस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम यांची शहराला शिस्त लावण्यास सुरुवात; पुण्यातील नामांकित पब आणि हुक्का पार्लरवर कारवाई

0
1723

पुणे, दि. १२ (पीसीबी) – पुणे पोलिस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम यांनी शहराला शिस्त लावण्यास सुरवात केली असून विकेंड आणि रात्रीच्या वेळेस बेकायदेशीर रित्या सुरु असलेल्या पुण्यातील नामांकित पब आणि हक्का पार्लरवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई  गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (दि.११) मध्यरात्रीच्या सुमारास केली.

पोलिसांनी कोरेगाव पार्क, मुंढवा, आणि चतुःश्रूंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मॅकलारेन्स पब, डेली ऑल डे, द बार स्टॉक एक्सचेज, वायकी, नाईट राईडर, नाईट स्काय, वेस्टीन, पेंटाहाऊस, हार्डरॉक, ओकवूड लाँज, ब्ल्यू शॅक, मयामी जे.डब्ल्यू मेरिएट या पब हॉटेल्स आणि हुक्का पार्लरवर कारवाई केली.  त्यांच्यावर वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे पोलिस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम यांनी पुणे पोलिस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर काही सुचना पत्रकारांकडून मागवल्या होत्या. या दरम्यान पुण्यातील नाईट लाईफ बाबत विविध प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केले होते. त्यामध्ये बेकायदेशीर रित्या सुरु असलेल्या पब हॉटेल्स आणि हुक्का पार्लरचा विषय गंभीर होता. बेकायदेशीरीत्या सुरु असलेल्या पब आणि हॉटेल्सवर अशा प्रकारची मोठी कारवाई ही पहिल्यांदाच केली गेल्याचे बोलले जात आहेत.

ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त देशपांडे आणि पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंग यांच्या नियंत्रणात करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश मोरे आणि भानुप्रताप बर्गे यांच्यासह ६ पोलीस निरीक्षक, ६ पोलीस उपनिरीक्षक आणि ४० पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.