Pimpri

पोलीस आयुक्तांच्या कार्याची गृहमंत्र्यांनी घेतली दखल

By PCB Author

October 19, 2020

पिंपरी,दि.18(पीसीबी):- जागतिक अंध दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्वतः डोळ्यावर काळी पट्टी बांधून कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले.अंध बांधवांच्या व्यथा,वेदना व गरजा या बाबत समाजात जनजागृती व्हावी यासाठी त्यांनी अंध विद्यार्थ्यांना पांढऱ्या काठीचे वाटप केले.त्यांनी केलेल्या या कार्याची दखल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली.समाजातील वंचीत घटकासाठी केलेली ही मदत पोलीस खात्याची प्रतिमा वाढविणारी असल्याचे सांगत त्यांनी या बाबत आयुक्तांचे कौतुक केले.

प्रेरणा असोसिएशन फॉर दि ब्लाईंड व जितो चिंचवड पिंपरी यांनी ‘चलो किसिका सहारा बने’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात केले होते.या प्रसंगी आयुक्तांनी उपस्थित दहा विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात दिशा दाखविणाऱ्या पांढऱ्या काठीचे व मिठाई चे वाटप केले.आयुष्यात असणाऱ्या अंधारातून उद्याच्या उजवल भविष्याची स्वप्नं पाहणाऱ्या अंध व्यक्तींनी खचून न जाता नवी व मोठी स्वप्नं पाहून यशाची शिखरे गाठवीत असा सल्लाही दिला.

दृष्टिहीनाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला अशा उपक्रमांची जोड गरजेची असते. त्यांच्या स्वाभिमानाचा आदर करतानाच आपल्याला जी मदत शक्य आहे ती केली पाहिजे. आपण केलेली ही मदत कौतुकास्पद आहे. पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून आपल्या या कृतीचा मला अभिमान आहे. https://t.co/dGH5sGGziU

— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) October 16, 2020

आयुक्तांनी डोळ्यावर काळी पट्टी व हातात काढी घेऊन व्यासपीठावर आगमन केले.याची चाहूल लागताच अंध विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.आयुक्तांनी या वंचीत घटकाला मदतीचा हात देऊन आत्मनिर्भर होण्याचा मंत्र दिला.या कार्यक्रमाची क्षणचित्रे आयुक्तालयाच्या संकेत स्थळावर प्रसिध्द झाली.याची दखल घेत गृहमंत्र्यांनी कौतुकाची थाप दिली.