पोलीस असल्याचे भासवून हातचलाखी करत दागिने पळवणा-या इराणी टोळीला बेड्या, वाकड पोलिसांची कामगिरी

0
394

वाकड, दि. १३ (पीसीबी) – पुढे काहीतरी घडले आहे, दागिने सुरक्षित ठेवा, आम्ही पोलीस आहोत; अशा बाता मारून नागरिकांचे सोन्याचे दागिने हातचलखीने पळवणा-या इराणी टोळीला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपींना ठाणे जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 6 लाख 22 हजार रुपये किमतीचे 125 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक दुचाकी, मोबाईल फोन हस्तगत केले आहेत.

हैदर तहजिब सय्यद (वय 55), युनुस साबुर सय्यद (वय 46, दोघे रा. पाटील नगर, आंबिवली पश्चिम, ता. कल्याण, जि. ठाणे), गाझी रफिक जाफरी (वय 35, रा. आंबिवली, इंदिरा नगर, मंगलनगर झोपडपट्टी, ता. कल्याण, जि. ठाणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा चौथा साथीदार हैदर ऊर्फ लंगडा पप्पू सय्यद ऊर्फ इराणी (वय 35, रा. आंबिवली, ता. कल्याण, जि. ठाणे) याचा पोलीस शोध घेत आहेत.

वाकड पोलीस ठाण्यात दाखल होता गुन्हा –

लक्ष्‍मण विठ्ठलराव देशमुख (वय 64, रा. द्वारकानगर, नागपूर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. 4 जानेवारी रोजी दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास कोकणे चौक रहाटणी येथील एका मिठाईच्या दुकानातून मिठाई खरेदी करून देशमुख घरी जात होते. त्यावेळी तीन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. त्यातील दोघांनी देशमुख यांना ते पोलीस असल्याचे भासवून त्यांचा विश्वास संपादन केला. देशमुख यांचे दागिने सुरक्षित पिशवीत ठेवण्याच्या बहाण्याने हातचलाखीने ते काढून घेतले. त्यानंतर तिसऱ्या अनोळखी व्यक्तीने देशमुख यांचे लक्ष इतरत्र वेधून तिघांनी देशमुख यांचे दोन लाख वीस हजार रुपये किमतीचे 55 ग्रॅम सोन्याचे दागिने पळवून नेले.

पाटील इस्टेट, लोणी काळभोर मार्गे वाकड पोलीस ठाण्याला –

या प्रकारचे आणखी तीन गुन्हे वाकड पोलीस ठाण्यात दाखल होते. या गुन्ह्यांचा वाकड पोलीस तपास करीत होते. त्यासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली. सीसीटीव्ही आणि गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून हे आरोपी इराणी असल्याचे पोलिसांनी निष्पन्न केले. सुरुवातीला पाटील इस्टेट आणि लोणी काळभोर येथील इराणी वस्तीत जाऊन वाकड पोलिसांनी चौकशी केली. मात्र आरोपी तिथले नसून ठाण्यातील आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान एका सीसीटीव्ही मध्ये आरोपी मुंबईच्या दिशेने जात असल्याचे दिसले. वाकड पोलिसांनी ठाणे शहर गाठले.

असा परिसर जिथे पोलिसांनाही घेरतात –

संभाव्य आरोपींपैकी हैदर सय्यद हा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. तसेच सर्व आरोपी आंबिवली या इराणी वस्तीत राहणारे असून त्यांना त्यांच्या वस्तीत जाऊन अटक करताना यापूर्वी अनेक पोलीस पथकाला जमावाने घेरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची उदाहरणे आहेत. तसेच त्या इराणी वस्तीतील महिला या आक्रमक असून पोलीस पथकाला कोणत्याही पुरुष आरोपीस आंबिवली वस्तीतून बाहेर घेऊन जात असताना प्रतिकार करतात. त्यामुळे अशा आरोपींना अटक करणे वाकड पोलिसांसमोर आव्हान होते.

वाकड पोलीस आणि खडकपाडा पोलिसांनी केली कारवाई –

वाकड पोलिसांची दोन पथके ठाण्याला पोहोचली. त्यानंतर स्थानिक पोलीस खडकपाडा पोलीस ठाण्यातील माहितगार अंमलदारांना घेऊन आंबिवली परिसरात जाऊन आरोपींचा शोध घेतला. मात्र सुरुवातीला पोलिसांना अपयश आले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा ठावठिकाणा शोधला. बनेली येथील एका हॉटेलच्या पाठीमागे आरोपी बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वाकड पोलिसांच्या दोन्ही पथकांनी छापा मारून दोघांना पकडले. मात्र पोलिसांची चाहूल लागताच एकजण पळून गेला आणि दलदलीच्या गवताळ भागात लपला. पोलिसांनी त्याला दलदलीच्या गवताळ भागातून शोधून काढले आणि अटक केली. त्यांच्या चौथ्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.

अटक केलेल्या आरोपींकडून 6 लाख 22 हजार रुपये किमतीचे 125 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक दुचाकी, मोबाईल फोन हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील चार, निगडी, हिंजवडी आणि मानपाडा ठाणे शहर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे सात गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरिक्षक (गुन्हे) संतोष पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस उप निरीक्षक गणेश तोरगल, पोलीस अंमलदार बिभीषन कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, जावेद पठाण, बापुसाहेब घुमाळ, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, दिपक साबळे, बंदु गिरे, प्रशांत गिलबीले, प्रमोद कदम, बाबा चव्हाण, अतिक शेख, अतिष जाधव, कल्पेश पाटील, कौतेय खराडे, अजय फल्ले व नुतन कोंडे यांनी केली आहे.