पोलीस अधिक्षक यु. टी. पवार यांच्यावर कुख्यात गुंड गजा मारणे याच्या वकिलाचा गंभीर आरोप; न्यायालयाने बजावली कारणे दाखवा नोटीस

0
1000

पुणे, दि. १८ (पीसीबी) – पुण्यातील कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे याला न्यायालयात हजर करण्याचे आदेश असताना त्याला न्यायालयात हजर न केल्याने येरवडा कारागृहाचे पोलीस अधिक्षक यु. टी. पवार यांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच त्याला हजर करण्यासाठी पैसे मागितले असल्याची तक्रार मारणे याच्या वकिलाने न्यायालयाकडे  केली आहे.

शनिवारी (दि.१६) गजा मारणेला न्यायालयात हजर करण्याचे आदेश होते. आदेशानुसार पोलीस अधिकारी केंद्रे आणि कर्मचारी आरोपी गजा मारणे याला घेण्यासाठी येरवडा कारागृहात गेले होते. परंतु, पवार यांनी गजा मारणेला न्यायालयात पाठविण्यास नकार दिला. पवार यांनी गजा मारणे याला धमकावत तुम्ही मला महिना सुरू केला नाही. तसेच, सांगितलेल्या वस्तूही पाठविल्या नाहीत. त्यासोबतच तसेही तुम्हाला आत सडविण्याचे आणि तुम्हाला जेलबाहेर न पाठविण्याचे पैसे मिळतात. असे सांगत गजा मारणेकडे पैशांची मागणी केली असल्याचे मारणे याच्या वकिलांनी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.  यावर न्यायालयाने येरवडा कारागृहाचे पोलीस अधिक्षक यु. टी. पवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून लेखी स्पष्टीकरण मागीतले आहे. यावर आता यु.टी.पवार न्यायालयाला काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.