Banner News

पोलिस झोपलेत काय , पाच वर्षांत तब्बल पाच हजार वाहनांची चोरी

By PCB Author

January 14, 2022

पिंपरी . दि. १४ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरात वाहनचोरांचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे. रोज सरासरी पाच वाहने चोरिला जातात असे पोलिसांचे रेकॉर्ड सांगते. सलग पाच वर्षांत चोरिला गेलेली वाहने आणि त्यापैकी उघडकिस आलेल्या चोऱ्यांचे प्रमाण पाहता पोलिस यंत्रणा झोपा काढते काय, असा सवाल लोक विचारत आहेत. पोलिस दप्तरी दाखल गुन्हे आणि उघड झालेले गुन्हे २०१८ मध्ये १२६८ चोरी (२७६ उघडकीस) ,२०१९ मध्ये ११४६ चोरी (२३५ उघडकीस), २०२० मध्ये ८४० वाहनांची चोरी (२११ उघडकिस) आणि २०२१ मध्ये १२३८ वाहनांची चोरी आणि फक्त २७३ प्रकऱणे उघडकीस आली आहेत. परप्रांतातील गुन्हेगार वाहने चोरून ती बाहेर ग्रामिण भागात स्वस्तात कमी किंमतीत विकत असल्याने या चोऱ्या लवकर उघड होत नाहीत.

गुरुवारी निगडी, एमआयडीसी भोसरी, चिखली, भोसरी आणि चाकण परिसरातून पाच दुचाकी वाहने चोरीला गेली आहेत. तर एमआयडीसी भोसरी मधून एक मोबाईल फोन चोरीला गेला आहे. याप्रकरणी गुरूवारी (दि. 13) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तानाजी इंदुराव माने (वय 47, रा. साईनाथ नगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माने यांच्या घराच्या पार्किंगमधून चोरट्यांनी त्यांची नऊ हजारांची दुचाकी चोरून नेली.

अमर सदाशिव गोंदुकुपे (वय 39, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे त्यांच्या मित्राची दुचाकी वापरत होते. मंगळवारी (दि. 11) सायंकाळी सहा वाजता दोन अनोळखी चोरट्यांनी माने इंडस्ट्रीज या कंपनीच्या समोरून त्यांची 15 हजारांची दुचाकी चोरून नेली.

मोहसीन मसनू शेख (वय 49, रा. यमुनानगर, निगडी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 40 हजार रुपये किमतीची दुचाकी रुपीनगर येथून चोरून नेली. सोमनाथ एकनाथ कानडे (वय 37, रा. महादेव नगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांची 20 हजारांची दुचाकी त्यांच्या घरापासून चोरून नेली.

समाधान लक्ष्मण सपकाळ (वय 22, रा. झित्राईमळा चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची दुचाकी हॅण्डल लॉक करून घराजवळ पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांची 15 हजारांची दुचाकी हॅण्डल लॉक तोडून चोरून नेली.

नसिम नुरमोहम्मद खान (वय 37, रा. मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन अज्ञात चोरट्याने बुधवारी (दि. 12) दुपारी एक वाजताच्या सुमारास नगरसेविका सारिका बो-हाडे यांच्या कार्यालयाजवळून चोरून नेला.