पोलिस उपायुक्त झाल्या अॅक्टीव; पिंपळे सौदागरमधील जुगार अड्ड्यावर छापा; ६२ जणांवर कारवाई करुन १९ हजार जप्त

0
1005

चिंचवड, दि. २१ (पीसीबी) – पिंपळे सौदागर येथील पत्राशेडमध्ये सरासपणे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून तब्बल ६२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच जुगार खेळताना जमा झालेली रोख रक्कम १९ हजार जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.२०) रात्री नऊच्या सुमारास परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या निर्देशानुसार वाकड आणि हिंजवडी पोलिस ठाण्यातील पोलिस पथकाने केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून खबर मिळाली की पिंपळे सौदागर येथील पत्राशेडमध्ये मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरु आहे. यावर पाटील यांनी बातमीची खात्री करुन पोलिस उपनिरीक्षक हरिष माने यांच्यासह वाकड आणि हिंजवडी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांचे एक पथक नेमून सोमवारी रात्री नऊच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील पत्राशेडवर छापा मारला. यावेळी त्यांना ४० ते ५० जण तेथे पत्ते खेळताना आढळून आले. पोलिस आल्याचे कळताच जुगाऱ्यांनी तेथून पळ काढला. मात्र पोलिसांनी पाठलाग करुन कालिदास दिवसे (वय ३७, रा. चिंचवड), चंद्रकांत मारुती खोपडे (वय ६४, रा. पिंपळे सौदागर), आणि झुणकर खान (वय ३६, रा. रहाटणी) या तिघांना अटक करुन त्यांच्यावर कारवाई केली. तसेच जुगार अड्याबाहेर उभ्या केलेल्या ६० दुचाक्या जप्त करुन त्यांच्या मालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तलय सुरु झाल्यानंतर स्वत: पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी पुढाकार घेऊन कारवाई केल्याने त्या चांगल्याच अॅक्टीव असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान दोन आठवड्यांपूर्वीच सांगवी परिसरातील एका जुगार अड्यावर छापा टाकून कारवाई करण्यात आली होती. मात्र लगतच्याच पिंपळे सौदागर भागात पुन्हा मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरु झाल्याने स्थानिक पोलिसांच्या संगनमताने असे अवैध धंदे सुरु असल्याचे बोलले जात आहे. यामुळे स्थानिकांमध्ये रोष आहे.