पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई केली जाईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
672

 

मुंबई, दि.२६ (पीसीबी) – ”राज्यात २१ दिवसांचा लॉकडाऊन, संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तू जसे की, दूध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य, कुकिंग गॅसचा आदी वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु राहणार आहे. तरीही बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी चिंताजनक आहे.

या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू घरपोच किंवा सोसायटी परिसरात उपलब्ध करण्याबाबत स्थानिक स्वराज संस्थांनी नियोजन करावे,” अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या. त्याचप्रमाणे राज्यभरात पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.

मात्र “कोरोना प्रतिबंधक कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना अजिबात सहन केल्या जाणार नाहीत, पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.तसेच “पोलिस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त, संयम पाळावा. लॉकडाउनच्या अंमलबजावणीसाठी अमेरिकेत लष्कराची मदत घेण्यात आली आहे. आपल्या राज्यात ती वेळ येऊ न देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे,” असेही त्यांनी म्हटले आहे.

यावेळी बोलताना अजित पवार यांनी काल राज्यभरात घडलेल्या अनेक घटनांवर संताप व्यक्त केला. ते म्हणाले, राज्यात संचारबंदी, प्रवासबंदी असतानाही काही नागरिकांनी जीव धोक्यात घालून दूधाच्या टँकरमध्ये बसून प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. वसईत पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर दुचाकी घालून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. बीडमध्येही पोलिसांवर हल्ला करण्यात आला.

मालेगावात लोकप्रतिनिधींनीच वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण केली. अशा घटनांमुळे करोनाविरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. जनतेनं कोरोनाचं गांभीर्य ओळखून वर्तन ठेवावे, पोलिसांना सहकार्य करावे,” असे आवाहनही त्यांनी केलं आहे.