पोलिसांच्या ताब्यातून आरोपीचे पलायन

0
411

पिंपरी, दि. 27 (पीसीबी) : पिंपरी- वैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या तीनपैकी एका आरोपीने पोलिसांच्या ताब्यातून पलायन केले. ही घटना वायसीएम रुग्णालय येथे मंगळवारी (दि. 26) दुपारी घडली. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश बाबुलाल पवार (वय २१, रा. आयप्पा मंदीराजवळ, काळेवाडी), गणेश ऊर्फ अजय दत्तात्रय कांबळे (वय १९ रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, नढेनगर काळेवाडी) आणि कृष्णा उत्तम सोनवणे (वय १९ रा. तापकीर मळा, चर्च समोर, काळेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. वाकड पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक आर. एस. मुदल यांनी मंगळवारी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीनही आरोपींना गंभीर स्वरुपाची दुखापत करणे, या गुन्हय़ाखाली अटक केली आहे. त्यांना वैद्यकीय तपासणी तसेच पुरावे गोळा करण्यासाठी वायसीएम रुग्णालय येथे मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास आणण्यात आले होते.
त्यावेळी तीनही आरोपींनी पोलिसांशी वाद घालत झटापट करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी कृष्णा सोनवणे आरोपी हा पळून जाण्यात यशस्वी झाला. त्याच्या विरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक रमेश केंगार याबाबत अधिक तपास करीत आहेत.