पोलिसांचा मनाई आदेश असताना आमदार महेश लांडगे यांचे ‘सेलिब्रेशन’

0
378

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्री राम मंदिराचा भूमीपूजन सोहळा आज दिमाखात पार पडला. या सुवर्णक्षणाचा योग साधून भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी शहरामध्ये 10 लाख लाडू वाटपाची तयारी केली. पिंपरी-चिंचवड पोलीस प्रशासनाचा मनाई आदेश असताना आमदार लांडगे यांनी शहरात ठिकठिकाणी लाडू वाटप करून श्री राम मंदिर भूमीपूजन सोहळा साजरा केला.

अयोध्या येथे श्री राम मंदिर भूमीपूजनाची आज केंद्र सरकारने तयारी केली होती. हा योग साधून आमदार महेश लांडगे यांनी शहरात 10 लाख लाडू वाटपाचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांनी दहा लाख लाडू वाटपाचे नियोजन केले. अशातच पिंपरी-चिंचवड पोलीस प्रशासनाने हा सोहळा साजरा करण्यासाठी सक्त मनाई आदेश काढला. यासंबंधीत त्यांना नोटीस बजावून हा सोहळा साजरा करण्यास प्रतिबंध घालण्यात आला. मात्र, आमदार लांडगे यांनी पोलीस प्रशासनाचा हा आदेश बाजुला सारून श्री राम भक्तांच्या मनातील भावना व्यतिथ व्हाव्यात, यासाठी शहरात ठिकठिकाणी लाडू वाटप करून सोहळा साजरा केला. दरम्यान, हिंदु बांधवांमध्ये जल्लोशाचे वातावरण निर्माण झाले होते.

आमदार लांडगे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या या सोहळ्याचे पिंपरी-चिंचवड भाजपच्या सर्व पदाधिका-यांनी, नगरसेवकांनी तसेच नागरिकांनी कौतुक केले. हिंदु धर्मियांचे स्वप्न आज साकार झाल्याची प्रचिती येत असल्याची भावना अनेकांनी आमदार लांडगे यांच्याकडे बोलून दाखविली. कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून हा सोहळा पार पाडण्यात आला. नागरिकांनी ही त्याला भरभरून प्रतिसाद दिला.

आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांनी आपापल्या प्रभागामध्ये लाडू वाटप केले. सर्व भागांमध्ये घरोघरी जाऊन नागरिकांना हा प्रसाद दिला. शहर भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने या सोहळ्यात सहभाग घेतला. भाजपच्या सर्वच पदाधिका-यांनी आमदार लांडगे यांच्या कार्याचे कौतुक केले. महिला नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्त्या यामध्ये सहभागी झाल्या होत्या.