Maharashtra

पोलादपूर अपघातातून बचावलेले प्रकाश सावंत यांची तडकाफडकी बदली

By PCB Author

September 14, 2018

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – पोलादपूर अपघातातून बचावलेले एकमेव प्रवासी प्रकाश सावंत यांची दापेली कृषी विद्यापीठातून रत्नागिरी मत्स्य महाविद्यालयात बदली करण्यात आली आहे. २८ जुलैला दापोली कृषी विद्यापीठाचे कर्मचारी, विद्यार्थी आणि चालक असे मिळून ३४ जण बसने दापोली येथून महाबळेश्वर येथे सहलीसाठी निघाले होते. आंबेनळी घाटात एका वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळून ३३ जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातातून प्रकाश सावंत हे आश्चर्यकारकरित्या बचावले होते.

या घटनेला एक महिन्यापेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. प्रकाश सावंत देसाई हे कृषी अधिकारी अपघातातून बचावले. मात्र त्यांच्यावर अनेक आरोप झाले. स्थानिक लोकांपासून ते मृतांच्या नातेवाईकांपर्यंत सगळ्यांनीच त्यांच्यावर आरोप केले. ३० ऑगस्टला प्रकाश सावंत यांच्या विरोधात मृतांच्या नातेवाईकांनी मोर्चाही काढला. दापोली कृषी विद्यापीठाने आपला चौकशी अहवाल यानंतर सादर केला. मात्र या अहवालात प्रकाश सावंत यांना क्लिन चिट देण्यात आली. मात्र लोक भावना लक्षात घेऊ आता प्रकाश सावंत देसाई यांची बदली करण्यात आली आहे.

प्रकाश सावंत यांनी वेगवेगळी विधान केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला असे पोलीस तपासातून पुढे आले. तर दुसरीकडे मृतांच्या नातेवाईकांनी प्रकाश सावंत यांची नार्को टेस्ट करावी अशीही मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहिले होते. विद्यापीठाने सावंत यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे अशीही मागणी होत होती. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सावंत यांची बदली करण्यात आली आहे.