पोर्तुगाल पोर्तुगालकडूनच पराभूत

0
207

म्युनिक, दि. २१ (पीसीबी) : जर्मनीच्या धारदार आक्रमणासमोर हैराण झालेल्या गतविजेत्या पोर्तुगालला सपशेल शरणागती पत्करावी लागली. जर्मनीने सामना ४-२ असा जिंकून युरो स्पर्धेच्या एफ गटातील चित्र गुंतागुंतीचे केले. जर्मनीच्या विजयात पोर्तुगालचाच हात अधिक होता. त्यांच्याकडून झालेल्या दोन स्वयं गोलमुळे त्यांना हा पराभव पत्करावा लागला.

यंदाच्या युरो स्पर्धेत एका सामन्यातील सर्वाधिक सात गोल या सामन्यात नोंदवले गेले. यातील पाच गोल पोर्तुगालने नोंदवले. तरी विजयाचे पारडे जर्मनीचे राहिले. पूर्वार्धात रोनाल्डो शो पुन्हा एकदा दिसून आला. त्यामुळे पोर्तुगालला आघाडी मिळवता आली. पण, त्यानंतर चार मिनिटांत त्यांनी स्वतःवरच दोन गोल नोंदवून घेतले. जर्मनीची धारजार आक्रमण परतवून लावताना पोर्तुगालच्या बचावफळीची धावपळ होत होती. अशाच धावपळीत एकदा नाही, तर दोनदा त्यांनी स्वतःवर गोल नोंदवून घेतले. प्रथम डिआस रुबेन आणि नंतर गुर्रेरोने बचावाच्या प्रयत्नात दिलेली चेंडूची दिशा त्यांच्याच जाळीत जाणारी ठरली.

जर्मनीची सुरवातच सनसनाटी होती. सामना सुरू होताच पहिल्या दहा मिनिटांत त्यांनी गोलचे खाते उघडले होते. पण, पंचांनी जर्मन खेळाडूला ऑफसाईड ठरवल्यामुळे हा गोल नाकारण्यात आला. त्यानंतर पहिली संधी मिळाल्यावर रोनाल्डोने आपले श्रेष्ठत्व सिद्ध करून एक सुरेख गोलची नोंद आपल्या नावावर केली. एका गोलने पिछाडीवर राहिल्यानंतरही जर्मनीच्या खेळात काही फरक पडला नव्हता. त्यांची आक्रमण आणि पोर्तुगालच्या बचावफळीची पळापळ हे चित्र कायम होते. त्यानंतर नशीब त्यांच्या आड आले. दोन स्वयंगोलचा घरचा आहेर त्यांना स्विकारावा लागला. पण, तोच त्यांच्यासाठी मारक ठरला.

उत्तरार्धात जर्मनीने आपले प्रयत्न सुरुच ठेवले आणि आणखी दोन गोलची नोंद केली. यात ५१व्या मिनिटाला हॅवर्टझ काई आणि ६०व्या मिनिटाला गोसेन याने गोल करून जर्मनीचा विजय भक्कम केला. त्यानंतर पुन्हा एकदा रोनाल्डोच्या सतर्कतेमुळे पोर्तुगालला एक गोलची पिछाडी भरून काढता आली. रोनाल्डोच्या पासवर जोटाने हा गोल केला. पण, ती त्यांची अखेरची धडपड होती.