पोरगी पळून गेली; चक्क बापाने चौकाचौकात श्रद्धांजलीचे पोस्टर लावले

0
1160

कोल्हापूर, दि.१४ (पीसीबी) – आपल्या मर्जीच्या साथीदाराला आयुष्यभराची साथ देण्यासाठी घरातून पळून जाऊन लग्न केलेल्या मुलीच्या वडिलांनी तिचे भावपुर्ण श्रद्धांजलीचे पोस्टर लावून तिला मृत घोषित केले आहे.

हे पोस्टर कागल तालुक्यातील व्हन्नूर गावात लावण्यात आले आहेत. आपली पोटची मुलगी प्रेमविवाहासाठी घरातून पळून गेली का जाहीर वाच्यता होऊ नये असाच बहुतेकांचा प्रयत्न असतो.मात्र व्हन्नूरमधील पित्याने चक्क आपल्या मुलीचे श्रद्धांजलीचे पोस्टर लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बाळ तू जन्माला येतानाच संधीवाताचा आजार तुझ्या आईला घेऊन आलीस. त्या वेदना सहन करीत ज्या आईनं तुझे सर्व हट्ट, लाड पुरवित तुला मोठं केलं. ती दुर्दैवी आई… आजपर्यंत तुला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारा… परंतु पुढच्या आयुष्यात आनंद, सुख देण्यास असमर्थ ठरलेला… ज्याला तू सोडून गेलीस… हा काळा दिवस पाहण्यासाठी जिवंत असलेला असा हा कमनशिबी बाप…” दोघेही शोकाकुल आहेत, असा मजकुर पोस्टरवर छापण्यात आला आहे.

दरम्यान, हा पोस्टर पाहून असे वागणाऱ्या मुलींच्या मनाचे परिवर्तन होऊन त्या आपल्या आई वडिलांचा विश्वासघात करणार नाहीत ही अपेक्षा, असेही पोस्टरवर लिहिले आहे.