Maharashtra

पैसे देऊनही आश्रमशाळेला मान्यता न दिल्याने संतापलेल्या व्यक्तीकडून मंत्रालयातील अधिकाऱ्याची धुलाई

By PCB Author

September 12, 2018

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – आश्रमशाळेला मान्यता मिळावी म्हणून मंत्रालयातील सामाजिक न्याय विभागातील अधिकाऱ्याला पैसे देऊन तीन वर्ष मंत्रालयात चकरा मारल्या परंतु त्या अधिकाऱ्याने मान्यता न देता मुजोरी केल्याने संतापलेल्या एका इसमाने त्या अधिकाऱ्याची चांगलीच दुलाई केली. ही घटना शुक्रवारी (दि.७) दुपारच्या सुमारास मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात घडली.

अरुण निटोरे (रा. उस्मानाबाद) असे मंत्रालयातील अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  शुक्रवारी दुपारच्या सुमारास अरुण निटोरे हे उस्मानाबादवरुन मंत्रालयात आले होते. मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या कार्यालया शेजारील कक्षेतील  अधिकाऱ्यांकडे ते एका आश्रमशाळेची मान्यता आणि एक आश्रमशाळा अनुदानावर आणण्याची प्रक्रिया करत आहेत. यासाठी ते तीन वर्षांपासून मंत्रालयात चकरा मारत आहेत. त्यांनी अधिकाऱ्याला पैसेही दिल्याचा दावा केला आहे. शुक्रवारी त्यांनी त्या अधिकाऱ्याला कामाची विचारणा केली. त्यावर त्या अधिकाऱ्याने मी तुझा एक पैशाचा मिंधा नाही, असे म्हणताच, अरुण निटोरेंनी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. पैसे घेऊनही मुजोरी करतोस, असे म्हणत अरुण निटोरेंनी त्या अधिकाऱ्याला मारहाण केली. हा सर्व प्रकार घडला त्यावेळी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचे पीएही उपस्थित होते.