पैशांची कामे अडली की, सत्तेतून बाहेर पडण्याच्या धमक्या: राज ठाकरेंची शिवसेनेवर टीका  

0
609

यवतमाळ, दि. २३ (पीसीबी) – पैशांचे काम असले की, सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी दिली जाते. तर काम झाले की, पुन्हा राजीनामे खिशांत गुंडाळून ठेवले जातात, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर केला. राज्यातील १८० तालुक्यात भीषण दुष्काळ पडला आहे. जमिनींना भेगा पडल्या आहेत. पाऊस कमी पडला आहे. पण शिवसेनेला राम मंदिराचे सुचायला लागले आहे, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.

यवतमाळमध्ये आयोजित मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, अमरावतीतील दुर्गम भागात शाळा स्थापनेनंतर ४५ वर्षानंतर पहिला विद्यार्थी उत्तीर्ण होता. भाजप शिवसेनेचे हेच का शैक्षणिक धोरण? असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्र हागणदारी मुक्त झाला, १ लाख २५ हजार विहिरी बांधल्या, मोदी म्हणाले होते की, २ कोटी रोजगार देणार, १.५ कोटी घरे बांधली. केवळ आकडे फेकून थापा मारण्याचे काम सरकार करत आहे. इतके धांदात  खोटे बोलणारे  सरकार पाहिले नव्हते, असे राज म्हणाले.

बेरोजगारी आणि दुष्काळावर कोणी बोलण्यास तयार नाही. जनावरांना चारा नाही. मात्र, शिवसेनेला राममंदिर बांधण्याची काळजी लागली आहे. सत्तेत असूनही शिवसेना सरकारवर टीका करत आहे. उध्दव ठाकरे काय बोलतात, तेच आता कळत नाही. आम्हाला सत्तेत राहून सरकारकडून कामे करून घ्यायचे असल्याचे शिवसेना सांगते. परंतु पैशांची कामे अडली की सत्तेतून बाहेर पडायची धमकी द्यायची आणि कामे झाले की, पुन्हा राजीनामे खिशात घालून सत्तेत बसायचे, असे शिवसेनेने सुरू केल्याची टीका राज ठाकरे यांनी यावेळी केली.