पेट्रोल, डिझेल दोन रुपये महागले

0
387

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – कोरोना काळातील बंद मुळे महसूल जी तूट आली ती भरून काढण्यासाठी राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेनच्या दरात दोन रुपये वाञ कऱण्याचा निर्णय केला. त्यातून दरमहा सुमारे ३०० कोटींचा लाभ होईल असा अंदाज आहे.

महसुलासाठी पेट्रोल-डिझेलवरील मूल्यवर्धित करात प्रति लिटर प्रत्येकी दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपासून (१ जून) राज्यात मुंबईपासून ते गडचिरोलीपर्यंत सर्वत्र पेट्रोल व डिझेल दोन रुपयांनी महाग होणार असून या दरवाढीमुळे पुढील १० महिन्यांत राज्य सरकारला तीन हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळेल.

देशभरात २५ मार्चपासून टाळेबंदीची अंमलबजावणी सुरू झाली. उद्योग-व्यवसाय, वाहतूक सर्वच आर्थिक व्यवहारांना त्यामुळे फटका बसल्याने राज्याच्या तिजोरीत पडणारा महसूल आटला. यामुळे राज्याचे उत्पन्न वाढवण्यासाठीच्या उपाययोजनांची गरज निर्माण झाली होती. वस्तू व सेवाकरामुळे राज्य सरकारच्या हातात करवाढीसाठी फारसे उपाय उरलेले नाहीत. त्यामुळे वित्तविभागाने हा निर्णय घेतला.

महसूल गणित..
राज्यात दरमहा सरासरी ११ लाख ६६ हजार किलोलिटर पेट्रोल व डिझेलची विक्री होते. एक किलोलिटर म्हणजे एक हजार लिटर. म्हणजेच राज्यात दरवर्षी सुमारे १ कोटी ३९ लाख ९२ हजार किलोलिटर पेट्रोल-डिझेलची विक्री होते. २०१९-२० मध्ये राज्य सरकारला पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित करातून एकूण २४ हजार ९०० कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.

राज्याला महसुलाची गरज असल्याने पेट्रोल व डिझेलवरील करात प्रत्येकी दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या करवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या विक्रीतून मिळणाऱ्या महसुलात दरमहा ३०० कोटी रुपयांची वाढ होईल. या आर्थिक वर्षांतील एप्रिल व मे हे दोन महिने गेल्यामुळे आता पुढील १० महिन्यांत तीन हजार कोटी रुपये करवाढीतून अतिरिक्त मिळतील.
– मनोज सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त)