पेट्रोल-डिझेलचा भडका सुरूच; आज पुन्हा दर वाढले

0
504

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत आज पुन्हा १२ पैशांची तर डिझेलच्या दरात ११ पैशांची वाढ झाली आहे. परिणामी, पेट्रोलचा आजचा दर ८७.८९ रू. प्रतिलिटर तर डिझेल ७७.०९ रू. प्रतिलिटर झाला आहे. तर, राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचा दर ८०.५० रुपये आणि डिझेलचा दर ७२.६१ रु. प्रतिलिटर झाला आहे. काल पेट्रोल ४८ पैशांनी तर डिझेल ५५ पैशांनी महागलं होतं, त्यामध्ये आज पुन्हा भर पडल्याने मोठा फटका सामान्य माणसाच्या खिशाला बसत आहे. राज्यातील परभणीमध्ये पेट्रोलसाठी सर्वात जास्त पैसे मोजावे लागत असून येथे तर पेट्रोलने नव्वदी ओलांडली आहे.

दुसरीकडे, केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलची केलेली प्रचंड दरवाढ, गगनाला भिडलेली महागाई, त्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने सोमवारी भारत बंदची हाक दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेकाप, पीपल्स रिपब्लिकन पक्ष इत्यादी पक्षांनी महाराष्ट्र बंद करण्याचे जाहीर केले आहे.

केंद्रातील भाजप सरकारच्या जनविरोधी धोरणाचा निषेध म्हणून पुकारण्यात आलेल्या या बंदमध्ये सर्व विरोधी पक्षांनी, कामगार संघटना, टॅक्सी, रिक्षाचालक संघटना, दुकानदार, व्यापारी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शनिवारी संयुक्त पत्रकार परिषदेत केले. बंदमधून दूध पुरवठा, सर्व रुग्णालये, औषधांची दुकाने व  शाळा-महाविद्यालयांना वगळण्यात आले आहे. शाळा-महाविद्यालये स्वत:हून बंदमध्ये सहभागी होणार असतील, तर त्यांचे स्वागत आहे, असे निरुपम म्हणाले.

केंद्र सरकारच्या विविध धोरणांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या शिवसेना व मनसेनेही या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन निरुपम व मलिक यांनी केले. शिवसेनेने बंदमध्ये सहभागी व्हावे, यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण त्या पक्षाच्या नेत्यांशी बोलणार आहेत, अशी माहिती निरुपम यांनी दिली.