पृथ्वीराज चव्हाण पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार?  

0
1211

पुणे, दि. १० (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे    स्वच्छ  प्रतिमेचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून रिंगणात  उतरवले जाण्याबाबत चाचपणी सुरू केल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांकडून समजते.

पुणे लोकसभा हा सुशिक्षित व बुध्दीवादी मतदारांचा मतदारसंघ ओळखला जातो. आधुनिक विचारशैली व विज्ञान तंत्रज्ञानाबाबत सजग असलेले मतदार येथे मोट्या संख्येने आहेत. सभ्यपणा, पारदर्शकता, स्वच्छ चारित्र्य  या गुणांना येथील मतदारांनी नेहमीच पसंती दिली आहे. त्यामुळे या निकषांत बसणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांना  या मतदारसंघातून रिंगणात   उतरवण्याबाबत काँग्रेसने विचार सुरू केला आहे.

पुणे शहरात माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या तरूण  मतदारांची संख्या  मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे त्यांना अपिल होणाऱ्या उमेदवाराचा शोध काँग्रेसने सुरू केला आहे.   पृथ्वीराज चव्हाण यांना सभ्य व उच्चशिक्षित राजकिय नेता म्हणून ओळखले जाते. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेचा प्रभाव मतदारांवर पडू शकतो. दरम्यान, राष्ट्रीय राजकारणात काँग्रेस अध्यक्ष  राहूल गांधी यांना  विश्वासू व अनुभवी तंत्रज्ञानाची जाण असलेल्या नेत्यांची  गरज आहे. त्यामुळेच    चव्हाण यांना पुन्हा दिल्लीच्या राजकारणात सक्रिय करण्यासाठी त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होऊ शकतो.