पृथ्वीराजच्या गायनाची वर्ल्ड रेकॉर्डस्‌ इंडियामध्ये नोंद; ‘जिनियस’ रेकॉर्डसाठी मानांकन जाहीर

0
741

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – पृथ्वीराज सतीश इंगळे याने विश्व विक्रमाची नोंद करून सांस्कृतिक क्षेत्रात मानाचा तुरा खोवला. १४ वर्षीय पृथ्वीराज यांने बालगंधर्व रंगमंदिरात दुपारी ३ ते रात्री ८ या पाच तासांच्या कालावधीत शास्त्रीय, भावगीत आणि चित्रपट गीते सादर करून आपण वंडबरबॉय असल्‍याचे दाखवून दिले. यावेळी  वर्ल्ड रेकॉडस्‌ इंडियाच्या प्रतिनिधींनी पृथ्वीराजने जागतिक विक्रम केला असून त्याचे २०१७-१८ या वर्षासाठी ‘जिनियस’ रेकॉर्डसाठी मानांकन करत असल्याचे जाहीर केले.  

पृथ्वीराजच्या विश्व विक्रमाचा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी पिंपरी- चिंचवड महापालिकेचे महापौर राहुल जाधव, पंडीत उपेंद्र भट, भावगीत गायक श्रीकांत पारगावकर, वर्ल्ड  रेकॉर्डस्‌ इंडियाचे प्रतिनिधी दिनेश पैठणकर, अनिरूध्द हळदे, संतोष राऊत, पृथ्वीराजच्या गुरु हिराताई दराडे, पृथ्वीराजचे वडील सतीश इंगळे, पृथ्वीराज थिएटरच्या संचालिका दयाताई इंगळे, मोहन कुलकर्णी, दत्ता थिटे, गफ्फार मोमीन, राजकुमार सुंठवाल आदी उपस्थित होते. युनिटी ग्रुप, उडान फाऊंडेशनच्या वतीने पृथ्वीराजचा सत्कार करण्यात आला.

पृथ्वीराजने तीन सत्रामध्ये शास्त्रीय संगीत, भावगीते, चित्रपट गीते सादर केली. कार्यक्रमाची सुरूवात राग सारंग ने करत पुढे अप्रतिम रीत्या राग मारूबिहाग सादर केला, यासाठी साथ संगत गुरू हिराताई दराडे यांनी केली. नंतर प्रथम तुला वंदितो, विठ्ठला तु वेडा कुंभार, देहाची तिजोरी, आकाशी झेप घेरे पाखरा, हनुमान चालीसा ही भक्ती गीते सादर केली. शेवटच्या सत्रात आ चल के तुझे, फुलोंका तारोंका सबका कहेना है, मेरी प्यारी बहनीया, मै शायर तो नही, मेरी मॉं, जगजीत सिंह यांची गझल ‘होश वालो को खबर क्या’ तर पृथ्वीराज व सतीश इंगळे यांनी शोले चित्रपटातील ये दोस्ती हम नही तोडेंगे अशी सर्व प्रकारची सुरेल गाणी सादर केली.

यावेळी मकरंद पाटणकर, संदिप पंचवाटकर, जितेंद्र भुरूक, मनिषा निश्चल, प्रिती पेठकर, आरती आठल्ये, स्वाती शहा व अनेक कलाकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संगीत संयोजन सईद खान यांनी केले. संयोजन मोहन कुलकर्णी, संगीतकार दत्ता थिटे, गायक गफार मोमीन, राजकुमार सुंठवाल यांनी केले. रंगमंच व्यवस्था राणे ब्रदर्स यांनी केली. स्वागत सतीश इंगळे यांनी तर सुत्रसंचालन स्नेहल दामले, आभार दया इंगळे यांनी मानले.