पूर्ववैमनस्यातून टोळक्यांनीचं केला निलंबित पोलिसावर खुनी हल्ला आणि….

0
613

दिघी, दि. २८ (पीसीबी) – मारहाणीच्या गुन्ह्यात पोलिसांनी आपल्याला पकडले याचा राग मनात ठेवून आरोपी आणि त्याच्या साथीदारांच्या टोळक्याने निलंबित पोलिसावर दगडाने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (दि. 27) रात्री येथे घडली. याप्रकरणी नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परमेश्वर तुकाराम सोनके (वय 41 रा. पोलीस कॉलनी, दिघी) यांनी मंगळवारी (दिनांक 27) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनिकेत हेमराज वाणी (वय 21, रा. चक्रपाणी वसाहत भोसरी), सुरज खिल्लारे, अनिल चव्हाण, भगत उर्फ धर्मेश सिंग, गणेश साबळे, राहुल जाधव व इतर दोन अनोळखी साथीदार यांच्या विरोधात खूनी हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनके हे सध्या चंदन नगर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असून एका प्रकरणामध्ये ते निलंबित झाले आहेत. मंगळवारी रात्री पावणेआठ वाजताच्या सुमारास मित्राच्या बहिणीचा साखरपुडा ठरवण्यासाठी ममता चौक दिघी येथून चालले होते. त्यावेळी रस्त्याच्या मध्यभागी थांबून आरोपींचे टोळके आरडाओरडा करत होते. फिर्यादी यांनी त्यांना समजावून सांगितले व तेथून जाण्यास सांगितले.

त्यानंतर फिर्यादी हे दिघी जकात नाका जवळ गेले त्यावेळी पाठीमागून आलेल्या आरोपींनी फिर्यादी यांची गाडी अडवली. त्यांच्या गाडीवर तुफान दगडफेक केली. आरोपी अनिकेत वाणी याला फिर्यादी यांनी दिघी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना यापूर्वी मारहाणीच्या गुन्ह्यात पकडले होते. त्याचा राग ठेवून फिर्यादी यांना दगडाने मारहाण केली. यामध्ये फिर्यादी सोनके हे गंभीर जखमी झाले आहेत.

तसेच गाडीचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर आरोपी जोरजोराने शिवीगाळ करत दहशत माजवत निघून गेले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.