पूरसंकट दूर झाल्यानंतर भाजपची महाजनादेश यात्रा सुरू होणार  

0
365

अहमदनगर, दि. १२ (पीसीबी) – माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन आणि  पूर परिस्थिती  यामुळे स्थगित करण्यात आलेली महाजनादेश यात्रा १७ ऑगस्टपासून सुरू होणार   आहे. या यात्रेचा पहिला टप्पा विदर्भात झाला आहे. आता दुसऱ्या टप्पा नगर आणि मराठवाड्यातून  सुरू होणार आहे. ही यात्रा १८ जिल्ह्यांतील ९३ विधानसभा मतदारसंघांत २ हजार ७४५ किलोमीटर  इतका प्रवास करणार आहे.

सांगली व कोल्हापूरात पूरस्थिती कमी होत असून मदतकार्य  वेगात सुरू आहे.  पूरग्रस्तांना औषधे, धान्य व अन्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. राज्यभरातील स्वयंसेवी संस्थांनीही या कामात पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रेचे नियोजन भाजपकडून सुरू  झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यात १८ ऑगस्ट रोजी यात्रा नगर जिल्ह्यात येणार आहे. १८ रोजी त्यांच्या अकोले व संगमनेरला सभा होणार आहे.  याच दिवशी राहुरी व नगरला स्वागत समारंभ होणार आहेत व १९ रोजी पाथर्डी, आष्टी व जामखेड येथे सभा घेऊन फडणवीस बीडकडे जाणार आहेत.