पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने दिलेली कर्जमाफी फसवी – राजू शेट्टी   

0
480

कोल्हापूर, दि. २५ (पीसीबी) – पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने दिलेली कर्जमाफी फसवी  आहे. खरीप पिकाच्या अटींच्या कर्जमाफीमध्ये गोलमाल असून यामध्ये शेतकऱ्यांना फारसा लाभ होणार नाही, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी करून  सरसकट कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरू, असा इशारा पत्रकाद्वारे दिला आहे.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत महापुराने नदीकाठची शेती उद्ध्वस्त झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच महापूरग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचे  पीककर्ज माफ केल्याचे जाहीर केले आहे; मात्र शासनाचा अध्यादेश पाहिल्यास खरीप पिकामध्ये शेतकऱ्यांना फारसा लाभ होणार नाही. कारण केळी, ऊस, भाजीपाला, फळबागा यांचे पीककर्ज हे एप्रिलच्या अगोदर घेतलेले आहे. केवळ २० टक्केच शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

शासन निर्णयानुसार १ एप्रिल ते १४ ऑगस्ट दरम्यान ज्यांनी कर्ज उचलले आहे, तेच या निकषांमध्ये बसणार आहेत. सन २०१८ मध्ये ज्यांनी कर्ज उचलेले आहे, त्या शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार लाभ होणार नाही. त्यामुळे या सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना  वाऱ्यावर  सोडले आहे. हे आम्ही कदापि सहन करणार नाही, प्रसंगी रस्त्यावर उतरू. सरसकट शेतकऱ्यांची  कर्जमाफी करण्यास भाग पाडू, असा इशाराही शेट्टी यांनी पत्रकात  दिला आहे.