Pune

पूरग्रस्त शिरगावला ‘कॅटलिस्ट फाउंडेशन’चा आधार; दोन ट्रक जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

By PCB Author

August 17, 2019

पुणे, दि. १७ (पीसीबी) –  सर्वत्र चिखलाचे साम्राज्य …. पाण्याखाली गेलेली शेती….पडलेल्या भिंती… उद्‌ध्वस्त झालेले संसार … मरण डोळ्यासमोर पाहिलेले असूनही परिस्थितीशी दोन हात करायला कंबर कसून उभा राहिलेले गावकरी हे चित्र आहे सांगली जिल्ह्यातील शिरगाव गावचे. शंभर टक्के पूर बाधित असणाऱ्या या गावात ‘कॅटलिस्ट फाऊंडेशन’ मार्फत मदत पोहचवण्यात आली. हवलदार वस्ती येथे तर सर्वात प्रथमच कॅटलिस्टमुळे मदत पोचली.

कृष्णा नदीच्या पोटात असल्याने सांगलीच्या वाळवा तालुक्यातील शिरगाव, हवलदार वस्ती, शिंदे वस्ती, नागठाणे या गावांना दरवर्षी पुराचा सामना करावा लागतो. या वेळी मात्र कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे धन धान्याने भरलेली घरे, जनावरांचे गोठे, कष्टाने पिकवलेली शेती, काडी –काडी जमवून उभा केलेला संसार सर्व वाहून गेले. रस्ते बंद असल्याने आजवर प्रशासनामार्फत किंवा स्वयंसेवी संस्थांमार्फत येणारी मदत गावात पोहचली नव्हती. गावांना जोडणारे रस्ते खुले होताच, दोन ट्रक जीवनावश्यक साहित्य कॅटलिस्ट फाऊंडेशन मार्फत देण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सुनील माने, पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक अजय खेडेकर, किरण दगडे पाटील, संस्थेच्या सचिव लक्ष्मीकांता माने, सदस्य समीर भुते, मिलिंद मोरे, नितीन मोनंदा, यांच्यासह पत्रकार वैभव सोनवणे, डेविड कॅड, रोनित वाघ, सचिन भुंडे पाटील, सचिन दगडे पाटील, यांनी गावाला प्रत्यक्ष भेट देऊन लोकांशी संवाद साधला तसेच त्यांना मदत दिली. पुणेकरांनी दिलेल्या या मदतीमुळे गावकरी भावूक झाले.

खासदार गिरीश बापट या संस्थेचे पालक तर लष्करी सेवेतून सेवानिवृत्त झालेले लेफ्टनंट जनरल डी.बी शेकटकर या संस्थेचे मेंटॉर आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी संस्था प्रयत्नशील होती. संस्थेच्या वतीने पुणेकरांनाही मदत देण्याचे आवाहन करण्यात आले होते. पूर ओसरल्यानंतर लोकांना कपडे व स्वच्छतेच्या  साहित्याची आवश्यक असल्याने संस्थेमार्फत महिला, पुरुष तसेच लहान मुला – मुलींची अंतरवस्त्रे,सॅनिटरी नॅपकीन, टॉवेल, टी शर्ट, साड्या, शर्ट, लहान मुलांसाठी कानटोप्या, महिलांसाठी स्टोल, परकर, पडदे, बेडशीट,पत्रावळ्या, धान्य, खाद्यपदार्थ, मसाले,खाद्यतेल, टूथपेस्ट, टूथब्रश, कपड्याचे आणि अंगाचे साबण,तसेच स्वच्छतेसाठी फिनेल, खराटे,ब्लिचिंग पावडर,हातमोजे,आणि प्रथोमपचारासाठी काही औषधांचे कीट यासारख्या वस्तूंचे ही वाटप करण्यात आले.

पुरामुळे सर्वच गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सर्वांनाच मदतीची आवश्यकता होती. मात्र मदत घेऊन गेल्यानंतर कोणत्याही प्रकारची गडबड, दंगा न करता गावकऱ्यांनी आमच्या कडून येणारी मदत रांगेत उभा राहून स्वीकारली. गावाच्या आजूबाजूला असणाऱ्या वाड्या वस्त्यांवर मदत मिळत नसल्याने येथील लोकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतय. त्यामुळे मदत घेऊन जाणाऱ्या लोकांनी वाड्या वस्त्यांपर्यंत मदत पोहचवावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुनील माने यांनी केले.