पूरग्रस्तांना मदत करायला गेलो आणि मीडियाने ३ मिनिटात महाराष्ट्रभर बोंग्या केला – निवृत्ती महाराज इंदुरीकर

0
611

शिर्डी, दि. १७ (पीसीबी) – प्रसिध्द कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर संगमनेरमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावरून इंदुरीकर यांनी आपल्या कीर्तनात चांगली टोलेबाजी केली. पूरग्रस्तांना मदत करायला गेलो आणि मीडियाने ३ मिनिटात महाराष्ट्रभर बोंग्या केला, असे त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा संगमनेरमध्ये आली होती. यावेळी इंदुरीकर महाराजांनी त्यांची भेट घेऊन कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांसाठी १ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला होता. त्यानंतर  महाराज संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांविरोधात लढणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. सर्व माध्यमांतून यासंदर्भात बातम्या आल्या होत्या.

दरम्यान, इंदुरीकर महाराजांनी या चर्चा फक्त चर्चाच  आहेत, यात काहीही तथ्य नाही, असे  स्पष्ट केले होते. तसेच आपण राजकारणात येणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते.  तर बाळासाहेब थोरातांनी याबाबत बोलताना महाराजही निवडणूक लढवू शकतात. महाराजांनी माझ्या कामाच्या कौतूक केले आहे. त्यामुळे त्यांचा पाठिंबा मलाच आहे, असे म्हटले होते.