श्रीनगर, दि. १६ (पीसीबी) – पुलवामातील अनंतपुरा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्याप्रकरणी ७ जणांना ताब्यात घेतले आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी पुलवामा जिल्ह्यात आणि अवंतीपुरा या परिसरात छापा टाकून ही कारवाई आज (शनिवार) केली.
जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी कामरान हा पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार आहे. त्यानेच हा कट रचला आणि आदिल अहमद याच्यामदतीने आत्मघाती हल्ला घडवून आणला, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कामरान हा पाकिस्तानी दहशतवादी असून दक्षिण काश्मीरमधील पुलवामा, अवंतीपुरा आणि त्राल भागात तो जैशचे नेटवर्क सांभाळतो, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, आरडीएक्सचा साठा असलेली कार सीआरपीएफच्या बसला (बस क्रमांक- एचआर ४९ एफ ०६३७) धडकवण्यात आली. जम्मू-श्रीनगर महामार्गावर पुलवामातील लाटूमोड येथे गुरुवारी (दि.१४) दुपारी ३ वाजून ३३ मिनिटांनी हा आत्मघाती हल्ला घडवून आणण्यात आला होता.