पुलवामा हल्ल्यानंतर भारताचा पाकला दणका; मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला

0
556

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला दणका दिला आहे. व्यापारासंदर्भात पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी भारताने पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला आहे.

जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) गॅट करारातंर्गत १९९६ साली भारताकडून पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा दिला होता. यानुसार, भारताला पाकिस्तान आणि जागतिक व्यापार संघटनेच्या अन्य सदस्य देशांना व्यापारात प्राधान्य देणे बंधनकारक आहे. पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संरक्षण समितीची बैठक पार पडली. या बैठकीत नरेंद्र मोदींसह परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन, अर्थमंत्री अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि सैन्याच्या तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते.

या बैठकीत पाकिस्तानला दिलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा (सर्वाधिक पसंतीच्या राष्ट्राचा ) दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती अरुण जेटली यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला सर्व स्तरावर एकटं पाडण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून कठोर पावले उचलण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. दहशतवादाला पाठबळ देणाऱ्यांना याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही जेटली यांनी दिला. गृहमंत्री राजनाथ सिंह हे श्रीनगरला जाणार असून ते सुरक्षेचा आढावा घेतील, अशी माहितीही जेटली यांनी दिली.