पुलवामा येथे शहीद झालेल्या ४२ जवानांमधील दोघे महाराष्ट्रातील बुलडाण्याचे

0
657

बुलडाणा, दि. १५ (पीसीबी) – जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४२ जवान शहीद झाले. त्यात बुलडाणा जिल्हयातील दोन जवानांचा समोवेश आहे.

संजय राजपूत (रा. मलकापुर, माता महाकालीनगर, बुलडाणा) आणि नितीन शिवाजी राठोड (लोणार तालुका, गोवर्धननगर तांडा, बुलडाणा) असे शहिद झालेल्या दोघांची नावे आहेत.

मेजर संजय राजपूत हे मलकापुरातील माता महाकाली नगरातील रहिवाशी आहेत. सात महिन्यापूर्वी त्यांच्या भावाचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या वीरमरणाची बातमी गावात धडकताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. गावात स्मशान शांतता पसरली आहे. आजुबाजुच्या ग्रामीण भागातून शहीद संजय राजपूत यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गावकरी जमले आहेत. पाकिस्तानला आजन्म लक्षात राहील अशी अद्दल घडली पाहिजे, अशी भावना शहीद राजपूत यांच्या नातेवाईकांनी आणि चिलाणे गावकर्‍यांनी व्यक्त केली आहे. शहीद संजय राजपूत यांचे पार्थिव मलकापुरकडे आणले जाईल, नातेवाईक मंडळी आणि गावकरी मलकापूरला जाणार आहेत.

नितीन शिवाजी राठोड हे लोणार तालुक्यातील बीबी येथून जवळच असलेल्या गोवर्धननगर तांडा येथील रहिवासी आहेत. नितीन हे केंद्रीय राखीव दलाच्या तीन बटालियनमध्ये २००६ ला आसाममध्ये भरती झाले होते. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण येथील आश्रमशाळेत झाले होते तर उच्च माध्यमिक शाळा शिक्षण दुसरबीड येथील जीवन विकास महाविद्यालयातून पूर्ण केले होते. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नितीनला लहानपणापासूनच सैनिकी सेवेची आवड होती. त्याच्याकडे दीड एकर एवढी शेती आहे. त्याचे पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी असून आई-वडील आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे.