पुलवामा येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक; चार जवान शहिद

501

पुलवामा, दि. १८ (पीसीबी) – पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच आज (सोमवार) पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुलवामा येथीलच पिंगलान येथे चकमक झाली. या चकमकीत चार जवान शहीद झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, पुलवामा येथील पिंगलान येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानुसार आज पहाटे सुरक्षा दलांनी या भागात शोधमोहीम राबवली. या शोधमोहीमेदरम्यान दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. या गोळीबारात पाच जवान जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एक जवान यात जखमी झाला आहे. शहीद झालेल्या चार जवानांमध्ये मेजर दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश आहे.  सुरक्षा दलांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले असून अजूनही चकमक सुरु आहे.

दरम्यान, हे दहशतवादी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.