Pimpri

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा लक्ष्मण जगतापांकडून निषेध; वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन

By PCB Author

February 14, 2019

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा येथे दहशतवाद्यांनी गुरूवारी (दि. १४) केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ३० जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्याचा पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (दि. १५) कोणतेही कार्यक्रम करू नयेत. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात देशासाठी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून सर्व कार्यक्रम रद्द करावेत, असे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे. केंद्रातील भाजप सरकार आपल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असेही आमदार जगताप यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात आमदार जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “काश्मीरमधील पुरवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्याला गुरूवारी दुपारी लक्ष्य केले. या हल्ल्यात ३० जवान शहीद झाले आहेत. तसेच अनेक जवान जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. अशा हल्ल्याने भारत देश डगमगणारा नाही. या हल्ल्याची दहशतवाद्यांना निश्चितच किमत चुकवावी लागणार आहे. केंद्रातील भाजप सरकार या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देईल.

भविष्यात दहशतवाद्यांना लक्षात राहिल असा धडा शिकवला जाईल. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाच्या दुःखात संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर सहभागी आहे. तसेच या हल्ल्याचा निषेधही करत आहे. आपल्या शहिद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. या हल्ल्यात ३० जवानांनी आपले प्राण गमावले असल्याने पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्याने शुक्रवारी (दि. १५) माझा वाढदिवस साजरा करू नये. वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांचे नियोजन केलेले असेल, तर शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून सर्व कार्यक्रम रद्द करावेत. जागोजागी जवानांना श्रद्धांजली वाहून देशाप्रती आपली समर्पित भावना व्यक्त करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.”