पुन्हा लॉक डाऊन वाढविण्यापेक्षा नियम पाळून पुढे जायला पाहिजे – देवेंद्र फडणवीस

0
400

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.23) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोविड समर्पित वायसीएम रुग्णालयाला भेट दिली. शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली. दरम्यान, नेते, पदाधिकाऱ्यांनी गर्दी केल्याने सुरक्षित अंतर, फिजिकल डिस्टनचा मात्र यावेळी फज्जा उडाल्याचे दिसून आले.

वाढते रुग्ण पाहता पुन्हा लॉकडाऊन वाढविण्यापेक्षा नियम पाळून पुढे जायला पाहिजे, असे ते म्हणाले.
महापौर उषा ढोरे, भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप , माजी खासदार अमर साबळे, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे, सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके, उपमहापौर तुषार हिंगे, आयुक्त श्रावण हर्डीकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक बाबू नायर, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, लोकलेखा समितीचे माजी अध्यक्ष सचिन पटवर्धन, अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे आदी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांचे पावणे एकच्या सुमारास वायसीएम रुग्णालयात आगमन झाले. सुमारे तासभर त्यांनी शहरातील कोरोनाची परिस्थिती, महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची संपूर्ण माहिती घेतली.वायसीएम रुग्णालय हे कोविडसाठी समर्पित केले आहे. दरम्यान, फडणवीस यांचे आगमन होताच हॉस्पिटलमध्ये फिरून  त्यांनी माहिती घेतली. कुठल्या प्रकारच्या केसेसे आहेत, त्यासाठी कसे प्रयत्न केले जातात याची माहिती  विचारली. एकूण कोरोनाच्या लढाईत इथे कसे उपचार होत आहेत ते पाहून त्यांनी समाधआन व्यक्त केले.  महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी सादरीकरण केले.

हॉस्पिटल भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाची स्थिती कशी आहे, त्याचे व्यवस्थापन कसे केले जाते याची सखोल माहिती मी घेतली. पेशंट मॅनेजमेंट कसे चालते ते पाहिले. डॅशबोर्डचे काम चांगले केले आहे. महाराष्ट्रात पेशंट वाढत असताना आपल्याला खूप अलर्ट राहावे लागणार आहे. त्यातच आता पावसाळा सुरू झाल्याने आणखी परिणाम संभवतो. लॉकडाऊन पुन्हा वाढविण्यापेक्षा लॉकडाऊन नसताना जे नियम पाळायला पाहिजेत त्याकडे लक्ष देऊन पुढे कसे जाता येईल ते पहायला पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, फडणवीस आले त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याने सुरक्षित अंतर, फिजिकल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा उडाला होता.