Banner News

पुन्हा मोदी सरकार; सट्टाबाजाराची पसंती

By PCB Author

May 19, 2019

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान आज (रविवार) होत आहे. या निवडणुकीत २०१४प्रमाणे मोदी लाट नसल्याबद्द्ल सर्वांचे एकमत आहे. भाजपच्या नक्की किती जागा कमी होतील, याचा नेमका अंदाज कुणालाच आलेला नाही. मात्र, मोदी सरकारच पुन्हा सत्तेवर विराजमान होईल, असा अंदाज सट्टाबाजारात व्यक्त केला जात आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

सट्टाबाजाराने  नवे सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला पहिली पसंती दिली आहे. एनडीएचे सरकार पुन्हा एकदा सत्तेवर येईल, असा अंदाज सट्टाबाजारात लावला जात आहे. भाजपला २४४ ते २४७ जागा मिळतील,  असा अंदाज वर्तवला जात आहे. भाजपच्या मित्रपक्षांना  ४० च्या आसपास जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.  दुबईतून हा सट्टा बाजार  या संबंधीच्या पैजा घेत असल्याची माहिती मिळत आहे

तर काँग्रेसला  निवडणुकीत २०१४ मध्ये मिळालेल्या जागांच्या दुप्पट म्हणजे  ८० च्या आसपास जागा  मिळण्याची  शक्यता सट्टा बाजाराने वर्तवली आहे.  दरम्यान, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी (दि.१७) पत्रकार परिषद घेत भाजप बहुमताने पुन्हा सत्तेवर येईल, असा दावा केला आहे. तर या पत्रकार परिषदेनंतर काही बुकींच्या मते भाजप बचावात्मक पवित्र्यात गेला आहे, असे म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीतील अखेरच्या सातव्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. २३ मे रोजी निकाल लागणार आहे. यावेळी सर्व चित्र स्पष्ट होईल. पण या निवडणूक निकालाचे अंदाज वर्तवण्यास सुरूवात झाली आहे. तर दुसरीकडे भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येत महाआघाडीची मोट बांधण्यासाठी गाठीभेटी घेण्यास सुरूवात केली आहे. पण सट्टाबाजाराने पंतप्रधान मोदींना पुन्हा एकदा पसंती दिली आहे. आता निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे.