Maharashtra

 पुन्हा एकदा १५ लाखांची चर्चा; रामदास आठवले काय म्हणाले ?    

By PCB Author

December 18, 2018

सोलापूर, दि. १८ (पीसीबी) – मोदी सरकार प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकणार आहेत, असे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी येथे केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा १५ लाखांची चर्चा होऊ लागली आहे. २०१९ मध्ये एनडीएचेच सरकार येईल आणि मोदीच पंतप्रधान होतील, असा विश्वासही आठवले यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

सोलापूरमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलताना आठवले म्हणाले की, मोदी सरकार प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात १५ लाख रुपये टाकणार  आहेत. तसेच जीएसटीचा कर कमी करणे, पेट्रोलियम पदार्थाचे दर आणि महागाई कमी करण्याचे प्रयत्न  सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले. शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा मुद्दाही एनडीएच्या बैठकीत मांडला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राफेलप्रकरणी  काँग्रेस खोटे बोलून गैरसमज पसरवत आहे. राफेल प्रकरणी न्यायालयाने क्लिनचिट दिली आहे. आताही काँग्रेस खोटे बोलले तर कॉँग्रेसला फटका बसेल,असे ते म्हणाले.  दरम्यान, देशातील प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात १५ लाख रुपये टाकणार हा केवळ जुमला होता, असे भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी यापूर्वी म्हटले होते. आता आठवले यांनी पुन्हा एकदा १५ लाखांचा मुद्दा समोर आणला आहे.