पुण्यात ५ लाखांची रोकड लुटल्याप्रकरणी भाजप माथाडी विभागाच्या अध्यक्षाला अटक

0
689

पुणे, दि. २२ (पीसीबी) – भाजपच्या माथाडी विभागाच्या अध्यक्षाला पाच लाख रूपयांची रोकड लुटल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.  खडक पोलिसांनी त्याला लोणावळ्यातून ताब्यात घेतले असून त्याच्याकडून  रोकड जप्त  करण्यात आली आहे.

शाम राजू शिंदे (वय ३१, रा. अरण्येश्वर)  असे माथाडी विभागाच्या अध्यक्षाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जून रोजी सेव्हन लव्हज चौकात सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एका कुरिअर कंपनीत काम करणारा तरुण पाच लाख रुपये घेऊन चालला होता. त्यावेळी आरोपी शाम शिंदे हा त्याच्या साथीदारासह चार चाकी वाहनातून  आला. आणि त्या तरूणाकडील  ५ लाख रूपयांची रोकड घेऊन पसार झाला.

या आरोपीचा शोध पोलिसांनी सुरू केला असता  पोलिसांना खबऱ्या मार्फत शाम शिंदे हा लोणावळ्यात असल्याची माहिती मिळली. त्यानुसार त्याला तिथे सापळा रचून अटक करण्यात आली . दरम्यान,  शाम  शिंदे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर दत्तवाडी, सहकार नगर आणि येरवडा भागात गुन्हे दाखल आहेत.