पुण्यात रस्त्यावर थुंकल्यास थुंकी साफ करण्याची शिक्षा

742

पुणे, दि. १२ (पीसीबी) – शहरात प्रवास करताना दुचाकी, चारचाकी, बस अथवा पायी चालताना रस्त्यांवर थुंकणाऱ्याविरोधात अधिकाऱ्यांनी कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.  रस्त्यावर थुंकणाऱ्यांना  दंडासह  थुंकी साफ करण्याची शिक्षाही देण्यात येत आहे.

रस्त्यावर थुंकताना पाहिल्यास संबंधित व्यक्तीला १०० रुपये दंड आकारण्यात येतो. तसेच त्याला कपडे आणि पाणी देऊन थुंकी साफ करण्याची शिक्षा देण्यात येते. स्वच्छतेबाबत जागृती आणि लोकांना स्वयंशिस्तीचे धडे देण्यासाठी संपूर्ण प्रभागात ही मोहीम सुरू  केल्याचे बिबवेवाडी प्रभाग अधिकारी अविनाश सकपाळ यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानातंर्गत सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, कचरा टाकणे, थुंकणे, उघड्यावर लघवी करणे, तसेच शौच करणे कायद्याने गुन्हा आहे. यासाठी शासनाने प्रत्येक महापालिकेला आपल्या कार्यक्षेत्रात अशा प्रकारे थुंकणे, घाण, कचरा टाकणे, उघड्यावर लघवी करणे, शौचास जाणाऱ्यांना दंड करण्याचे अधिकार दिले आहेत.